आजच्या वृत्तपत्र गठ्ठ्यांची राशीनमधून चोरी

कर्जत : प्रा. किरण जगताप

कर्जत तालुक्यातील राशीन येथील वृत्तपत्र विक्रेते किशोर दिगंबर कांबळे यांच्या सोमवार, दि. ३१ मार्च रोजीच्या सकाळ, पुढारी, पुण्यनगरी, लोकमत यासह १० वृत्तपत्रांच्या गठ्ठ्यांची चोरी झाली आहे. नेहमीप्रमाणे अहिल्यानगर येथून पेपर गाडीने वाहतूक करून वितरकांनी वृत्तपत्रांचे गठ्ठे कांबळे यांच्या दुकानासमोर ठेवले. आज सकाळी पावणेसात वाजेच्या सुमारास हे गठ्ठे ठेवण्यात आले होते. किशोर कांबळे हे वृत्तपत्रांचे वाटप करण्यासाठी सात वाजेच्या सुमारास दुकानाकडे गेले असता त्यांना हे गठ्ठे आढळून आले नाहीत.

त्यानंतर कांबळे यांनी टॅक्सी चालकांना संपर्क केला. त्यांनी नेहमीप्रमाणे हे गठ्ठे दुकानासमोर ठेवून गेल्याचे सांगितले. कांबळे यांच्यामार्फत चिलवडी, करपडी, खेड या ठिकाणी वृत्तपत्रांचे पार्सल वितरित केले जाते. त्यातील चिलवडी येथील पार्सल समिंदर काळे घेवून गेले होते. त्यांनी सर्व वृत्तपत्रांचे गठ्ठे दुकानासमोर असल्याचे सांगितले. मात्र, त्यानंतर हे गठ्ठे कांबळे यांना आढळून आले नाहीत. कांबळे यांनी त्यानंतर आसपासच्या व्यवसायिकांकडे चौकशी केली, मात्र त्यांना याबाबत माहिती मिळाली नाही, नसल्याने या वृत्तपत्रांची चोरी झाल्याचे कांबळे यांनी सांगितले.

या प्रकरणी कर्जत पोलिसात फिर्याद देणार असून सीसीटिव्ही फुटेजची तपासणी केली जाणार असल्याचे किशोर कांबळे यांनी ‘कर्जत लाईव्ह’शी बोलताना सांगितले.