आ. रोहित पवारांच्या नगरसेवकांवरील अविश्वासामुळे नगराध्यक्षांवर अविश्वास !

कर्जत : प्रा. किरण जगताप

कर्जत नगरपंचायतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची स्पष्ट बहुमताची सत्ता असून पक्षाचे १७ पैकी १२ नगरसेवक आहेत. निवडणुकीत काँग्रेसचे ३ नगरसेवकही राष्ट्रवादीच्या सोबत राहिले आणि सत्तेत सहभागी झाले. या सत्तासंरचनेचा मुख्य आधार आ. रोहित पवार यांचे नेतृत्व आहे. मात्र, गेल्या काही महिन्यांतील घडामोडींमुळे त्यांच्या नेतृत्वावर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.

अडीच वर्षांचा करार आणि सुरू झालेला विसंवाद

नगराध्यक्ष पद महिलांसाठी राखीव असल्यामुळे आणि राऊत कुटुंबाचा स्थानिक राजकारणातील दीर्घकाळचा प्रभाव लक्षात घेऊन उषा अक्षय राऊत यांना अडीच वर्षांची नगराध्यक्षपदाची संधी देण्यात आली. ही संधी आ. रोहित पवार यांच्या संमतीनेच देण्यात आली होती. मात्र, अटीप्रमाणे अडीच वर्षांची मुदत पूर्ण झाल्यानंतरही उषा राऊत यांनी स्वतःहून पदाचा राजीनामा देणे नगरसेवकांना अपेक्षित होते. मात्र तसे न झाल्यामुळे इतर नगरसेवकांमध्ये असंतोष वाढला.

नगरसेवकांनी आमदार पवार यांची भेट घेऊन आपली नाराजी व्यक्त केली आणि ठरल्याप्रमाणे नवे नेतृत्व स्थापन करण्याची मागणी केली. मात्र, पवार यांनी कोणताही ठोस निर्णय न घेता प्रकरण लांबणीवर टाकले. यामुळे नाराज नगरसेवकांनी स्वतंत्रपणे पुढाकार घेत, उषा राऊत यांच्याविरुद्ध अविश्वास प्रस्ताव दाखल केला.

भाजपचा हस्तक्षेप आणि सत्तेसमोरील आव्हान

या घडामोडींमध्ये भाजपचे नेते प्रवीण घुले पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपाच्या २ नगरसेवकांना पुढे आणले गेले. राष्ट्रवादी व काँग्रेसमधील असंतुष्ट नगरसेवकांच्या सहकार्याने अविश्वास प्रस्ताव दाखल करण्यात आला. या प्रस्तावामुळे सत्तेत असलेल्या गटामध्ये अधिकच गोंधळ निर्माण झाला.

राऊत यांची प्रतिक्रिया आणि राजकीय अट

नगराध्यक्षा उषा राऊत तसेच राष्ट्रवादीचे नेते व नगरसेवक नामदेव राऊत आणि अन्य नगरसेवकांनी एकत्र येऊन पत्रकार परिषद घेतली. उषा राऊत यांनी आपण राजीनामा देण्यास तयार असल्याचे स्पष्ट केले. मात्र, त्यांनी एक अट ठेवली. यापूर्वी ठरल्याप्रमाणे काँग्रेसच्या उपनगराध्यक्ष असलेल्या रोहिणी घुले यांनीही पदाचा राजीनामा द्यावा. ही अट म्हणजे सत्तेतील घटकांमध्ये परस्पर संशयाचे वातावरण असल्याचे लक्षण आहे.

सत्तासंघर्षाच्या मुळाशी नेतृत्वाचा कमकुवतपणा

या सर्व परिस्थितीमागे मुख्य कारण म्हणून आ. रोहित पवार यांची अनुत्तरदायी नेतृत्वशैली अधोरेखित होते. त्यांनी नगरसेवकांशी संवाद ठेवण्यात सातत्याने दुर्लक्ष केले. नगरसेवकांचे विविध सामाजिक प्रश्न, विकास कामे व इतर विषयांवर बैठका घेतल्या नाहीत. त्यांच्याबाबत विश्वासाचे वातावरण, संवाद ठेवला नाही. त्यामुळे सत्तेतील नगरसेवकांनाच नगरपंचायतमध्ये आंदोलन करण्याची वेळ आली. या गोष्टींचा थेट परिणाम नगरपंचायतीच्या सत्ताकारणावर झाला.

राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेसारख्या महत्त्वाच्या कार्यक्रमातही पवारांवर नाराज असलेल्या नगरसेवकांनी सहभाग नोंदवला नाही. ही नाराजी स्पष्ट असूनदेखील, पवार यांनी याकडे लक्ष दिले नाही. अखेर त्यांच्या नेतृत्वाखालील नगरसेवकांनीच भाजपाच्या सोबत एकत्र येऊन अविश्वास ठराव आणला.

स्वतःभोवती वर्तुळ तयार करून प्रत्यक्ष संपर्काला फाटा

आ. रोहित पवार यांच्याभोवती ठराविक लोकांचे वर्तुळ तयार झाल्याचे दिसते. हेच लोक ठराविक माहिती देऊन इतर कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांबद्दल संभ्रम पसरवतात. त्यामुळे निष्ठावंत कार्यकर्ते दूर जात आहेत आणि गट-तट निर्माण झाल्याचे चित्र दिसत आहे.

सभापती प्रा. राम शिंदे यांचे वाढते बळ

या सगळ्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसमधीलच काही नगरसेवक आणि काँग्रेसचे नगरसेवक सभापती प्रा. राम शिंदे यांच्या संपर्कात गेले. त्यामुळे कर्जत नगरपंचायतीतील सत्ता संतुलन पूर्णतः ढासळण्याच्या मार्गावर आहे. आ. रोहित पवार यांच्यासाठी ही स्थिती केवळ राजकीय नाही, तर वैयक्तिक नेतृत्वाच्या विश्वासावरचा मोठा धक्का आहे.

कर्जत नगरपंचायतीतील सध्याची परिस्थिती ही एखाद्या पदासाठीची लढाई नसून नेतृत्वाच्या अपयशाचे परिणाम आहेत. पक्षात असंतोष, सत्तेसाठी संघर्ष, आणि भाजपसारख्या विरोधी पक्षाशी वाढती जवळीकता या सगळ्या घटनांचा केंद्रबिंदू म्हणजे आ. रोहित पवार यांनी केलेला विसंवाद हेच असल्याचे दिसते. आ. रोहित पवार यांच्या या कार्यपद्धतीचा भविष्यातही परिणाम जाणवण्याची चिन्ह दिसत आहेत. ही बाब केवळ नगरपंचायतीपुरती मर्यादित राहणार नाही, तर रोहित पवार यांच्या संपूर्ण राजकीय प्रवासावर त्याचा परिणाम होऊ शकतो.