
रयत शिक्षण संस्थेच्या अळसुंदे येथील न्यू इंग्लिश स्कूलमधील ज्येष्ठ शिक्षक सुनील अर्जुन गोरखे यांनी नुकतेच महाराष्ट्र शासनाच्या गृह विभाग, पोलीस विभाग आणि शिक्षण विभाग यांच्या संयुक्त अधिपत्याखाली घेण्यात आलेले महाराष्ट्र राज्य वाहतूक सुरक्षा व नागरी संरक्षण (RSP) अधिकारी प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण केले. हे प्रशिक्षण २१ मे २०२५ ते ३० मे २०२५ या कालावधीत पोलीस मुख्यालय, अहिल्यानगर येथे पार पडले.

या प्रशिक्षणामध्ये महाराष्ट्र राज्य वाहतूक सुरक्षा दल व नागरी संरक्षण संघटना, नागपूर यांच्या मार्गदर्शनाखाली पदचालन, वाहतूक नियंत्रण, नागरी संरक्षण, अग्निशमन सेवा, प्रथमोपचार व आकस्मिक सेवा अशा विविध बाबींवर सखोल मार्गदर्शन देण्यात आले. महाराष्ट्र शासनाच्या नियमानुसार, शिक्षक सेवेत असतानाही RSP अधिकारी बनून खाकी वर्दी परिधान करण्याची संधी सुनील गोरखे यांना मिळाली. विद्यालयाचे मुख्याध्यापक रामदास परहर यांनी सांगितले की, येत्या शैक्षणिक वर्षापासून विद्यार्थ्यांना शिस्त व अनुशासनाचे धडे विशेष तासिकांद्वारे दिले जाणार आहेत.

या प्रशिक्षणासाठी मुसा सय्यद, मेजर मोरे, मेजर दाभाडे, विभागीय समादेशक सिकंदर शेख, जिल्हा समादेशक बोंतले, उपजिल्हा समादेशक प्रकाश मिंड, कर्जत तालुका समादेशक अभिमन्यू बेरगळ, राखीव पोलीस निरीक्षक उमेश परदेशी आणि जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांचे विशेष मार्गदर्शन लाभले. वयाच्या ५३ व्या वर्षी विद्यार्थ्यांच्या हितासाठी हे कठीण प्रशिक्षण पूर्ण केल्याबद्दल स्थानिक सल्लागार समिती, शालेय व्यवस्थापन व विकास समिती, माता-पालक संघ, पालक-शिक्षक संघ, अळसुंदे ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच व सदस्य, सर्व शिक्षणप्रेमी नागरिक, शिक्षक रवींद्र विधाते, प्रवीण कांबळे, सुरेश कुमार देशमुख, नितीन जगताप आणि सर्व विद्यार्थी-विद्यार्थिनींनी सुनील गोरखे सरांचे विशेष अभिनंदन केले आहे.