
अहिल्यानगर येथील खेळाडू विराज गजेंद्र पिसाळ याने उत्तराखंड येथे राष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धेत सुवर्णपदक पटकाविले. विराज हा अहिल्यानगरचा तायक्वांदो स्पोर्ट्स असोसिएशन व एकलव्य तायक्वांदो अकॅडमीचा खेळाडू आहे. त्याने राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करून यश संपादन केले. येणाऱ्या एशियन युथ गेमसाठी विराजची भारतीय संघात नाव निश्चित होण्याची सर्वांना प्रतीक्षा आहे.

इंडिया तायक्वांदो या देशातील एकमेव अधिकृत राष्ट्रीय संघटनेतर्फे उत्तराखंड येथे २९ मे ते १ जून दरम्यान राष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धा झाली. यामध्ये विराजने प्रथम क्रमांकाचे सुवर्णपदक पटकाविले. विराज केडगाव येथील एकलव्य तायक्वांदो अकॅडमीत मुख्य प्रशिक्षक गणेश वंजारे, योगेश बिचीतकर, सचिन मरकड, मंगेश आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करीत आहे. अहिल्यानगर बार असोसिएशनचे माजी उपाध्यक्ष ॲड. गजेंद्र पिसाळ व शिक्षिका स्मिता पिसाळ यांचा तो मुलगा तर जिल्हा सहकारी बँकेचे संचालक अंबादास पिसाळ यांचा नातू आहे.
