
कर्जत तालुक्यातील शिंदे येथे उद्योजक संदीपशेठ घालमे यांच्या वतीने गुरुवार, २७ फेब्रुवारी २०२५ रोजी रात्री ८ ते १०.३० या वेळेत विठ्ठल-रुक्मिणी मंदिरासमोर ‘छावा’ चित्रपटाचे भव्य मोफत प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. आठ बाय बारा फुटांच्या एलईडी स्क्रीनवर हा चित्रपट दाखवला जाणार असून, शिंदे येथील ग्रामस्थांना मोठ्या पडद्यावर ऐतिहासिक चित्रपट पाहण्याचा आनंद मिळणार आहे.

हा कार्यक्रम गावातील सर्व नागरिक, विशेषतः महिला आणि लहान मुलांसाठी आयोजित करण्यात आला आहे. छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित हा चित्रपट ऐतिहासिक आणि प्रेरणादायी असून, नव्या पिढीपर्यंत त्यांच्या पराक्रमाची गाथा पोहोचवण्याचा प्रयत्न या माध्यमातून केला जात आहे. ग्रामीण भागात मोफत चित्रपट प्रदर्शन दुर्मिळ असल्याने ग्रामस्थांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.
अभिनेता विकी कौशलच्या दमदार अभिनयाने सजलेला ‘छावा’ चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत असून, पहिल्याच आठवड्यात बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करत आहे. भव्य युद्धदृश्ये, उत्कट कथानक आणि ऐतिहासिक पार्श्वभूमी यामुळे हा चित्रपट चर्चेचा विषय ठरत आहे.
या अनोख्या चित्रपट सोहळ्याचा आनंद घेण्यासाठी ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे. इतिहासाचा गौरव करणारा आणि सामाजिक एकता वाढवणारा हा कार्यक्रम ग्रामस्थांसाठी एक संस्मरणीय अनुभव ठरणार आहे.
- राहुल अडसूळ, कर्जत तालुका प्रतिनिधी