कर्जत तालुक्यातील विद्यार्थ्यांना उद्योजक मेघराज बजाज यांच्याकडून खाऊ वाटप

कर्जत : प्रा. किरण जगताप

कर्जत तालुक्यातील राशीन येथील उद्योजक मेघराज बजाज यांनी सामाजिक बांधिलकीतून तालुक्यातील विविध शाळांमधील विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप केले. त्यांच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

बजाज यांनी आपल्या व्यवसायातून सामाजिक कार्याला अग्रक्रम दिला असून, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना आनंद मिळावा, त्यांच्या चेहऱ्यावर हास्य यावे, या हेतूने त्यांच्याकडून हा उपक्रम राबवला जात आहे. यापूर्वी त्यांनी शेकडो शाळांना फर्निचर भेट देऊन सामाजिक काम उभारलेले आहे.

बजाज यांनी मंगळवारी कर्जत तालुक्यातील कोळवडी, बेनवडी, कुळधरण, चिंचेचे लवण, गुंड वारे वस्ती या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप केले. त्यांच्यासमवेत दादासाहेब काळे, दानवले हे उपस्थित होते. शाळांच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. कुळधरण जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत मुख्याध्यापक नितीन पाटील, मंदाकिनी नरसाळे, अशोक घालमे यांनी बजाज यांचे स्वागत केले. बजाज यांनी यावेळी विद्यार्थ्यांशी संवाद साधला.



ग्रामीण भागात अशा प्रकारच्या सामाजिक उपक्रमांची नितांत आवश्यकता आहे. विद्यार्थ्यांना प्रेरणा देणारे आणि त्यांना शिक्षणाकडे आकर्षित करणारे कार्यक्रम वेळोवेळी होणे गरजेचे आहे. मेघराज बजाज यांनी केलेल्या या कार्यामुळे सामाजिक बांधिलकीचा उत्तम आदर्श निर्माण झाला आहे.