कर्जतमध्ये रास्ता रोको ; सकल मराठा समाज आक्रमक

कर्जत : प्रा. किरण जगताप

बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच कै. संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा देऊन यामध्ये सहभागी असलेले राज्याचे मंत्री धनंजय मुंडे यांचा आरोपींना पाठिंबा असल्याने त्यांनाही सहआरोपी करून तात्काळ अटक करावे या मागणीसाठी कर्जतमध्ये सकल मराठा समाजाचे प्रमुख समन्वयक रावसाहेब धांडे यांच्या नेतृत्वाखाली रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. उद्या बुधवार दि. ५ फेब्रुवारी २०२५ रोजी कर्जत बंद ठेवण्याबाबत तहसीलदारांना निवेदन देण्यात आले.

बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच कै. संतोष मुंडे यांची अत्यंत निर्घृणपणे माणुसकीला काळीमा फासणारी हत्या करण्यात आली. या घटनेला दोन महिने पूर्ण झाले असून या प्रकरणातील मारेकरी अजूनही फरार आहेत. संतोष देशमुख यांची हत्या करताना त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात अमानुषपणे मारहाण करून व मानवतेला लाजवेल असे कृत्य केलेले आहे. त्यांच्या हत्येचा व्हिडिओ समाजमाध्यमात आला असल्याने त्यांच्याविरुद्ध फास्टट्रॅक कोर्टात खटला चालवून मारेकर्‍यांना त्वरित फाशीची शिक्षा देण्यात यावी.

पोलीस प्रशासनाचा कोणताही धाक राहिला नसल्याने निदर्शनास आले आहे. या हत्येचा मास्टरमाइंड वाल्मीक कराड हा धनंजय मुंडे यांचा अत्यंत जवळचा व विश्वासू कार्यकर्ता असल्याने तसेच या प्रकरणात सहभागी असलेल्या आरोपींना पाठिंबा देत असल्याचे उघडकीस येत आहे. त्यामुळे या खटल्यामध्ये त्यांना सहआरोपी करून अटक करण्यात यावी व यांची आमदारकी त्वरित रद्द करण्यात यावी. आमच्या तीव्र भावना प्रशासनाला कळवून आम्हाला न्याय द्यावा अशी मागणी सकल मराठा समाजाच्या वतीने करण्यात आली आहे.

राहुल अडसूळ, कर्जत तालुका प्रतिनिधी