
समाजासाठी अविरत झटणाऱ्या कार्यकर्त्याचे अचानक जाणे ही मोठी हानी असते. त्यांचे कुटुंब, गाव, पक्ष आणि समाज यांच्यासाठी ही पोकळी निर्माण करणारी घटना असते. कर्जत तालुक्यातील बारडगाव सुद्रिक येथील सुहास उर्फ कारभारी गावडे यांचे पोटाच्या विकाराने दुःखद निधन झाले. काही दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरू होते. प्रकृती सुधारत असल्याची आशा असतानाच काळाने घात केला आणि एक मनमिळावू, कर्तव्यनिष्ठ व्यक्तिमत्त्व काळाच्या पडद्याआड गेले.

कर्जत भाजपाच्या दिव्यांग सेलचे तालुकाध्यक्ष म्हणून कार्यरत असलेल्या सुहास गावडे यांनी संघटनेसाठी दिलेले योगदान अतुलनीय होते. स्वतः अपंग असूनही त्यांनी प्रतिकूल परिस्थितीवर मात करत दुसऱ्यांसाठी काम करण्याचा ध्यास घेतला. समाज आणि संघटनेसाठी निष्ठेने कार्य करणारा, सर्वांशी आत्मीयतेने वागणारा, सामाजिक प्रश्नांसाठी अहोरात्र झटणारा असा नेता विरळच असतो. त्यांनी पक्षाच्या माध्यमातून अनेक समाजोपयोगी उपक्रम हाती घेतले. विशेषतः गरजू, वंचित आणि दिव्यांगांसाठी त्यांनी समर्पित भावनेने सेवा केली. त्यांच्या या कार्यामुळेच पक्ष आणि समाजाच्या विविध स्तरांतील लोक त्यांच्याशी आपुलकीने जोडले गेले होते.
त्यांचा प्रभाव केवळ स्थानिक पातळीपुरता मर्यादित नव्हता, तर ते भाजपाच्या वरिष्ठ नेतृत्वाशी थेट संपर्कात असत. भारतीय जनता पक्षातील सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसाठी ते हवेहवेसे वाटणारे व्यक्तिमत्त्व होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापासून ते पक्षाच्या अनेक वरिष्ठ नेत्यांपर्यंत त्यांचा सहज वावर होता. कर्जत जामखेड मतदारसंघाचे भाग्यविधाते, विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांचे अत्यंत निकटवर्ती म्हणून त्यांची ओळख होती. सभापती प्रा. राम शिंदे यांनी त्यांना थेट ॲक्सेस दिला होता, त्यामुळे भाजपाच्या अनेक कार्यक्रम, उपक्रमांमध्ये त्यांना विशेष महत्त्व होते. त्यांच्या कार्यतत्परतेमुळे पक्षात त्यांचे स्थान अत्यंत दृढ झाले होते.
सुहास गावडे यांच्या प्रकृती अस्वास्थ्याची बातमी कळताच प्रा. राम शिंदे यांनी त्यांच्या घरी जाऊन तब्येतीची विचारपूस केली होती. प्रकृतीत सुधारणा होत असल्याचे वाटत असतानाच ही दुर्दैवी घटना घडली. त्यांच्या निधनाने केवळ गाव किंवा पक्षच नाही, तर संपूर्ण समाज पोरका झाला आहे. त्यांच्या कार्याने अनेकांना प्रेरणा मिळाली होती. समाजातील समस्यांना भिडण्याची त्यांची वृत्ती आणि सकारात्मक दृष्टिकोन आजही अनेकांसाठी दिशादर्शक ठरेल.
सुहास गावडे यांच्या अकाली जाण्याने समाजाची मोठी हानी झाली आहे. त्यांच्या कुटुंबियांसाठी ही कधीही भरून न निघणारी पोकळी आहे. त्यांच्या पश्चात कुटुंबीय, नातेवाईक, मित्रपरिवार आणि सहकारी शोकाकुल आहेत. त्यांच्या कुटुंबियांना या दुःखातून सावरण्याची शक्ती मिळो, हीच प्रार्थना !
भावपूर्ण श्रद्धांजली !
कर्जत लाईव्ह टीम