कर्जतमध्ये रंगणार ‘महाराष्ट्र केसरी’ कुस्तीचा थरार

कर्जत : प्रा. किरण जगताप

महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेच्या मान्यतेने कर्जत- जामखेड मतदारसंघात प्रथमच प्रतिष्ठेच्या ‘महाराष्ट्र केसरी’ कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून, या स्पर्धेसाठी बांधण्यात आलेल्या मैदानाचे पूजन आ. रोहित पवार यांच्या हस्ते १५ मार्च रोजी होणार आहे. कर्जतमधील दादा पाटील महाविद्यालयाशेजारील मैदानावर सकाळी १० वाजता हा सोहळा पार पडणार आहे. यावेळी महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेचे पदाधिकारी, कुस्तीपटू उपस्थित राहणार आहेत.

२६ ते ३० मार्च दरम्यान होणाऱ्या या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत राज्यातील विविध वजन गटातील ९०० हून अधिक नामांकित मल्ल सहभाग घेणार आहेत. विशेष म्हणजे आजवर ‘महाराष्ट्र केसरी’ ची गदा पटकावलेले सर्व विजेतेही या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेला हजेरी लावणार आहेत. तसेच, तब्बल ४० वर्षापासून महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष राहिलेले ज्येष्ठ नेते शरद पवार यांचीही स्पर्धेच्या समारोपाला उपस्थिती राहणार आहे. कुस्तीला आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा मिळाव्यात आणि मल्लांना योग्य प्रशिक्षण व संधी उपलब्ध व्हावी, हा या स्पर्धेचा प्रमुख उद्देश असून ही ऐतिहासिक महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा पाहण्यासाठी देशासह राज्यभरातून कुस्तीप्रेमींनी उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेच्या माध्यमातून महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. यापूर्वी त्यांनी कर्जतमध्ये देशपातळीवरील आंतरविद्यापीठ महिला कुस्ती स्पर्धेचे आयोजन केले आहे. त्यामुळे महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेच्या पदाधिकाऱ्यांच्या आणि कुस्ती क्षेत्रातील अनुभवी मान्यवरांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेच्या नियोजनातही कोणती कसर राहणार नाही याची दक्षता आ. रोहित पवार आणि इतर सर्व सहकाऱ्यांकडून घेण्यात येणार आहे.