कार्यकर्त्यांची छाटणी करणारे खुरटे नेते !

कर्जत : प्रा. किरण जगताप

राजकारणात नेतृत्वाला कार्यकर्त्यांचा आधार लागतो. कार्यकर्त्यांच्या मेहनतीवरच नेत्याचे नाव पुढे जाते. मात्र, काही नेते आपल्या कार्यकर्त्यांना पुढे येऊच देत नाहीत. कार्यकर्ता मोठा झाला, तर आपली ओळख पुसून जाईल, आपली जागा तो घेईल, अशी भीती त्यांना वाटते. त्यामुळे हे नेते कार्यकर्त्यांना विविध संधींपासून दूर ठेवतात. त्यांना महत्त्वाच्या बैठकींना बोलवत नाहीत, कार्यक्रमात सहभागी होऊ देत नाहीत. माध्यमांपासूनही त्यांना लांब ठेवले जाते.

हे नेते कार्यकर्त्यांचा वापर फक्त गरजेपुरता करतात. निवडणुकीच्या काळात प्रचार, सभा, मोर्चे यासाठी त्यांचा उपयोग होतो. मात्र, निवडणूक संपल्यावर त्यांना दुर्लक्षित केले जाते. त्यांच्या कर्तृत्वाला वाव न देता सतत खालच्या पातळीवर ठेवले जाते. ‘पायातली वहाण पायात बरी’ या उक्तीप्रमाणे त्यांना दुय्यम वागणूक दिली जाते.

मात्र, कार्यकर्त्यांना दबावून ठेवण्याचा हा प्रयत्न नेत्यालाच महागात पडतो. कारण कोणताही एकटा नेता गावागावातील जनतेशी संपर्क ठेवू शकत नाही. कार्यकर्ते हे काम प्रभावीपणे व हिरीरीने सहभाग घेऊन करत असतात. कार्यकर्त्यांकडूनच नेत्याचे नाव जनमानसात अधिकाधिक पोहचत असते. कार्यकर्त्यांचे नेटवर्कच नेत्याला मोठे करत असते. कार्यकर्त्यांना योग्य वागणूक न दिल्यामुळे कार्यकर्ते नाराज झाले, तर ते दुसऱ्या गटात जाण्याचा विचार करतात तसेच नेत्यापासून दूर राहणे पसंत करतात. त्यातूनच, नेत्याचा प्रभाव हळूहळू कमी होत असतो.

खरा नेता तोच, जो कार्यकर्त्यांना मोठे करतो. त्यांना संधी देतो. कार्यकर्त्यांनी गावोगाव ओळख निर्माण केली, की नेत्याचा प्रभाव वाढतो. त्यामुळे नेत्याने संकुचित मानसिकता सोडून कार्यकर्त्यांना प्रोत्साहन देणे आवश्यक असते. कार्यकर्त्यांचा विकास झाला, तरच नेत्याचेही राजकारण मजबूत होत असते.

मात्र, नेत्याने कार्यकर्त्यांना वारंवार दडपण्याच्या प्रयत्न केला तर नेत्याचे पतन हे ठरलेले असते. वाटमारी करत पुढे आलेले नेते कार्यकर्त्यांची वाढ रोखता रोखता शेवटी स्वतःच खुरटतात. म्हणूनच नेत्यांनी संकुचित वृत्ती सोडून कार्यकर्त्यांच्या यशात आपले यश पाहिले पाहिजे. अन्यथा कार्यकर्त्यांच्या छाटणीतच नेत्याचे राजकारण संपून जाते. राजकीय अडथळा शर्यतीचे आयोजक अर्थातच खुरटे नेते हे सर्वत्र पाहायला मिळतात.

आपल्या कर्जत – जामखेड मतदारसंघातही यांची वानवा नाही. अगोदरचे कमी म्हणून की काय, आता यांच्यात नव्याने भर पडत आहे. भयगंडाने पछाडलेल्या अशा आत्मकेंद्री नेत्यांना आपण ओळखलेय ना ?