कर्जत नगरपंचायत स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या वारसांना तात्काळ सेवेत सामावून घ्या

कर्जत : प्रा. किरण जगताप

कर्जत ग्रामपंचायत कार्यकाळापासून स्वच्छता कर्मचारी म्हणून कार्यरत असलेल्या कर्मचारी महिलांनी आयुष्यभर तुटपुंज्या वेतनावर सेवा दिली. या महिला कर्मचाऱ्यांमध्ये लिलाबाई भाऊ कांबळे, कमल शिवाजी भिसे, विमल सुधाकर आखाडे, भामाबाई लष्मण भैलुमे यांचा समावेश आहे. तसेच, पूर्वी कार्यरत असलेल्या पार्वती ईश्वर कदम, सुशिला मारूती ओव्हळ आणि विमल मुरलीधर लोढे या स्वच्छता कर्मचाऱ्यांनीही ग्रामपंचायत कालखंडापासून स्वच्छतेची जबाबदारी पार पाडली आहे.

या कर्मचाऱ्यांनी दीर्घकाळ अल्प वेतनावर काम करूनही त्यांना सेवेतून कमी करण्याची नोटीस कर्जत नगरपंचायतीने पोस्टाद्वारे पाठवली. ही कारवाई अन्यायकारक असून, नगरपंचायतीकडून कर्मचाऱ्यांविषयी द्वेषभावना असल्याचे दिसते. शासन निर्णयानुसार या महिला कर्मचाऱ्यांच्या वारसांना सेवेत सामावून घेणे गरजेचे असताना, त्यांना सेवानिवृत्त करण्याच्या हालचाली सुरू आहेत.

प्रत्यक्षात या महिला कर्मचाऱ्यांचा यथोचित सत्कार करून, त्यांना सन्मानपूर्वक निवृत्त करणे आवश्यक होते. त्यांच्या जागी त्यांचे वारस शासनाच्या परिपत्रकानुसार मुख्याधिकारी आणि सभागृहाच्या मान्यतेने सेवेत घ्यायला हवे होते. मात्र, तसे न करता कर्मचाऱ्यांना थेट कामावरून कमी करण्याची नोटीस पाठवण्यात आली.

या अन्यायकारक निर्णयाविरोधात नगरसेवक भास्कर भैलुमे यांनी 2 एप्रिल 2025 पासून कर्जत नगरपंचायत कार्यालयात आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे. यामध्ये जाहिर धरणे आंदोलन, जागर गोंधळ आंदोलन आणि नगरपंचायतीला टाळे ठोक आंदोलनाचा समावेश असेल.

या निवेदनावर पाणीपुरवठा सभापती भाऊसाहेब तोरडमल आणि रविंद्र सुपेकर यांच्या सह्या आहेत.