काकासाहेब तापकीर यांनी करून दाखवले : सभापती प्रा. राम शिंदे

कर्जत : प्रा. किरण जगताप

कर्जत तालुक्यासह परिसरातील शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव मिळावा या उद्देशाने राशीन येथे नवीन भुसार मार्केट उपबाजाराची बाजारपेठ उपलब्ध करून दिली आहे. पुढील काळात अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून कोल्ड स्टोरेज सुविधा उपलब्ध करून देऊ. मंत्री झालो असतो, तर एकाच खात्याचा निधी मिळाला असता. परंतु सभापती झाल्यामुळे जनतेच्या, शेतकऱ्यांच्या विकासासाठी विविध खात्यांचा निधी मिळवून देऊ. तसेच हमाल, मापाडी कामगार यांचे प्रश्न मार्गी लावू. सभापती काकासाहेब तापकीर यांनी सकारात्मक काम करून कृषी उत्पन्न बाजार समितीचा चेहरा मोहरा बदलून टाकला आहे. आतापर्यंत न झालेले काम त्यांनी करून दाखवले आहे, असे प्रतिपादन विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांनी केले. राशीन येथे नवीन भुसार मार्केट उपबाजाराच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत केले.

ते पुढे म्हणाले, आम्ही शेतकऱ्यांच्या हिताचे काम करत आहोत. त्यामुळे कर्जत तालुका बाजार समितीचा पारदर्शक कारभार शेतकऱ्यांपर्यंत पोहोचला आहे. तसेच राशीन येथील बैल बाजारामध्ये नवी गाळे तयार करण्यात येत आहेत. त्यामुळे मार्केट कमिटीचे उत्पन्न वाढेल आणि शेतकरी व व्यापाऱ्यांना विविध सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा बँकेचे संचालक अंबादास पिसाळ होते. यावेळी बाजार समितीचे सभापती काकासाहेब तापकीर म्हणाले, शेतकरी व व्यापाऱ्यांना नवीन भुसार मार्केटचा फायदा होईल, या उद्देशाने बाजारपेठ उपलब्ध करून दिली. शेतकऱ्यांनी आपला माल या मार्केटमध्ये आणावा व योग्य भाव घ्यावा. नवीन भुसार मार्केटमध्ये अंतर्गत रस्त्यासाठी निधी उपलब्ध करून द्यावा, तसेच माल साठवण्यासाठी जागा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी त्यांनी सभापती प्रा. राम शिंदे यांच्याकडे केली.

यावेळी जिल्हा बँकेचे संचालक अंबादास पिसाळ, शहाजी राजेभोसले, रवींद्र कोठारी यांची भाषणे झाली. प्रास्ताविक व्यापारी असोसिएशनचे सचिव राकेश भंडारी म्हणाले, वीस वर्षांपासून केलेली मागणी आज कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती काकासाहेब तापकीर यांच्यामुळे पूर्ण झाली आहे. कर्जत तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचा मका व उडीद उत्पादनामध्ये महाराष्ट्रात दुसरा क्रमांक आला आहे. राशीन येथील नवीन भुसार मार्केट महाराष्ट्रात प्रसिद्ध होईल, असेही ते म्हणाले.

कार्यक्रमासाठी उपसभापती अभय पाटील, संचालक श्रीहर्ष शेवाळे, संग्राम पाटील, मंगेश जगताप, सतीश कळसकर, लहू वतारे, बळीराम यादव, वसंत कांबळे, अमोल पाटील, अल्लाउद्दीन काझी, प्रवीण घुले, बापूसाहेब नेटके, राजेंद्र गुंड, बापू धोंडे, शेखर खरमरे, बंडाभाऊ मोढळे, प्रतिभा रेणुकर, सचिन पोटरे, पप्पूशेठ धोदाड, मालोजी भिताडे, शिवाजी काळे, अमोल झगडे, आजिनाथ मोढळे, रमेश सायकर, महेंद्र जंजिरे, अजयकुमार दोशी, दादा सायकर, जयराम पवार, प्रशांत काळे, नारायण जगदाळे, राकेश भंडारी यांच्यासह विविध मान्यवर व मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दादा शिंदे यांनी केले. आभार संचालक श्रीहर्ष शेवाळे यांनी मानले.