पुरोगामित्वाचा बुरखा : बोलण्यात प्रकाश, वागण्यात अंधार !

कर्जत : प्रा. किरण जगताप

आज अनेकजण स्वतःला ‘पुरोगामी’ म्हणवून घेतात. पण खरे पुरोगामित्व फक्त बोलघेवडेपणात नसते तसेच ते घोषणांमध्ये किंवा कोणाला विरोध करण्यात नसते. विशेषतः राजकीय क्षेत्रात असलेल्या अनेकांकडून फक्त हिंदुत्वाला विरोध करणे म्हणजे पुरोगामी, असा भ्रम तयार केला जात आहे. त्यावरच त्यांची राजकीय दुकानदारी चालत असल्याचे दिसते. पुरोगामी विचार म्हणजे विचारपूर्वक, विवेकाने आणि समाजहिताच्या दृष्टीने आधुनिकतेची वाट धरून चालणे.

खरे पुरोगामित्व हे महात्मा फुले, छत्रपती शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि संत परंपरा यांच्या कार्यात दिसते. या सर्वांनी समाजातील विषमता, अन्याय, आणि अंधश्रद्धा संपवण्यासाठी आयुष्य वाहिले. त्यांनी कधीच कोणाला वैयक्तिक द्वेषाने विरोध केला नाही. उलट त्यांनी शिक्षण, समता, आणि बंधुत्वाचा मार्ग दाखवला.समाज हितासाठी त्यांनी संघर्ष केला, मात्र तो द्वेषाचा नव्हता ; तो जागृतीचा, सुधारण्याचा आणि आत्मसन्मानाचा होता.

पुरोगामी असणे म्हणजे प्रत्येक गोष्टीकडे तारतम्याने आणि विवेकाने पाहणे. समाजातील चांगल्या गोष्टींचा स्वीकार करणे, चुकीच्या गोष्टींविरुद्ध शांतपणे पण ठामपणे उभे राहणे, हे पुरोगामित्वाचे खरे स्वरूप आहे. फक्त विखारी टीका करणे, घोषणाबाजी, पोपटपंची करणे किंवा सोशल मीडियावर वाद घालणे याने समाज बदलत नाही.

आज गरज आहे ती प्रत्यक्ष कृतीची. आपल्या परिसरात, शाळांमध्ये, वाड्या- गावांमध्ये मुलांना शिक्षणाचे महत्त्व समजावणे, अंधश्रद्धेविरुद्ध जनजागृती करणे, स्त्रियांना समान संधी देणे, पर्यावरण आणि स्वच्छतेसाठी काम करणे हेच खरे पुरोगामी कार्य आहे.

पुरोगामी विचार हा शांततेचा, समतेचा आणि कृतीशीलतेचा विचार आहे. फक्त कोणालाही विरोध करण्याने कोणी विचारवंत ठरत नाही ; त्याला कृतीची जोड असायला असावी. समाजात आपल्या परीने सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी प्रयत्न करणे म्हणजे पुरोगामीत्वाच्या दिशेने जाणे होय.

आता फुले, शाहू, आंबेडकर आणि संतांच्या विचारांना कृतीत उतरवण्याची आवश्यकता आहे. समाजातून जातीभेद, विषमता आणि अंधश्रद्धा संपवून इतरांबाबत आदर राखत माणुसकीचा मार्ग स्वीकारण्याची गरज आहे. छोट्या चांगल्या कृतींनी मोठा बदल घडतो. जेव्हा प्रत्येक जण विवेकाने आणि समतेने वागेल, तेव्हाच खरे पुरोगामित्व समाजात फुलेल, असे वाटते.