
भारतीय जनता पक्षाचे निमंत्रित सदस्य सुनील यादव यांनी रोहित पवार यांच्या विरोधात जोरदार टीका केली आहे. यादव यांनी म्हटले आहे, पाच – सहा वर्षांपूर्वी निलेश घायवळ आणि सचिन घायवळ हे रोहित पवार यांच्यासोबत होते. परंतु एका खोट्या प्रकरणात या दोघांवर खोटे आरोप करून त्यांना बदनाम केले गेले. हे दोघे सभापती राम शिंदे यांच्या संपर्कात गेल्यानंतर रोहित पवार यांनी त्यांच्या विरोधात आरोप सुरू केले आहेत, असे सुनील यादव यांनी म्हटले आहे. रोहित पवार यांनी गायवळ भावांना राजकारणात पुरेपूर वापरून घेतले, त्यानंतर त्यांना त्रास दिला. अनेक वर्ष जवळ राहिलेल्या गायवळ यांच्यावर रोहित पवारांनी तंगडी वर केली आहे. त्यांच्या अशा वर्तनामुळेच त्यांच्या पक्षाचा कर्जत – जामखेडमध्ये अंत होणार आहे.

यादव यांनी पुढे म्हटले की, जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका होईपर्यंत कर्जत- जामखेड मतदारसंघात रोहित पवार यांचा पक्ष संपवणार आहे. पवार हे पैसे देऊन निवडणुकीत मतदानाची व्यवस्था करतात. लोकांची दिशाभूल करून ते हे काम करतात. नंतर पाच वर्षे गरीब जनतेला त्रास सहन करावा लागतो. राजकारणाचा अड्डा बनल्याने कर्जतचे दादा पाटील कॉलेज मोडकळीस आले आहे, पण काहींना पैसे मिळत असल्यामुळे हे प्रकार घडत असल्याचे यादव यांनी म्हटले आहे.

त्यांनी असेही सांगितले की राम शिंदे कर्जत तालुक्यात आल्यानंतर गावागावातील भारतीय जनता पार्टीत प्रवेश करून घेतील आणि पक्ष संघटन अधिक मजबूत करतील. मी स्वतः कोणत्याही गावात जाऊन शेतकऱ्यांचे प्रश्न शंभर टक्के सोडवतो. रोहित पवार लोकांची कामे करीत नसल्यामुळे त्यांच्या बाबत लोकांमध्ये नाराजीचा सूर आहे. त्यामुळे मला काम करायला जास्त हुरूप येत असल्याचे यादव यांनी म्हटले आहे.




