
सरपंच ते महाराष्ट्र विधान परिषदेचे सभापती असा उंच भरारी घेणारा प्रवास म्हणजेच नामदार रामजी शिंदे साहेब. कोणताही राजकीय वारसा नसताना चोंडीसारख्या छोट्या गावात जन्म घेतलेल्या एका सामान्य सालकऱ्याच्या पोटी जन्मलेले रामजी शिंदे साहेब आज महाराष्ट्राच्या उच्च सभागृहाचे सभापती म्हणून राज्याच्या राजकारणात एक वेगळा ठसा उमटवत आहेत.

हा प्रवास म्हणजे संघर्ष, जिद्द, निष्ठा आणि समाजसेवेचे जिवंत उदाहरण आहे. सामान्य कुटुंबातील परिस्थितीतून येऊन उच्च शिक्षण घेणे आणि प्राध्यापक होणे ही सोपी बाब नव्हती. मात्र प्रतिकूल परिस्थितीवर मात करून शिक्षणाची कास धरत त्यांनी स्वतःचा मार्ग घडवला. आई-वडिलांकडून मिळालेले कष्टाचे, प्रामाणिकपणाचे आणि समाजभानाचे संस्कार हेच त्यांच्या आयुष्याचे बळ ठरले. नोकरीत स्थैर्य असूनही मन न रमल्याने त्यांनी सुरक्षित नोकरी सोडली आणि गावी परतून समाजसेवेचा वसा स्वीकारला. याच समाजसेवेच्या माध्यमातून चोंडी ग्रामपंचायतीचे सरपंच पद त्यांनी मिळवले.

राजकीय आणि सामाजिक प्रवासात कुटुंबाचाही मोलाचा वाटा राहिला. त्यांच्या पत्नी आशाताई शिंदे या जामखेड पंचायत समितीच्या सभापती झाल्या. हे यश सहज मिळालेले नव्हते त्यामागे अनेक संघर्ष, त्याग आणि चिकाटी दडलेली होती. भारतीय जनता पार्टीमध्ये काम करताना शिंदे साहेबांनी तालुका अध्यक्ष, जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष अशा विविध जबाबदाऱ्या समर्थपणे पार पाडल्या. या प्रत्येक पदावर त्यांनी पक्षनिष्ठा, संघटन कौशल्य आणि कार्यकर्त्यांशी असलेले आत्मीय नाते सिद्ध केले.


कर्जत-जामखेड मतदारसंघ खुला झाल्यानंतर दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांना उमेदवारी मिळाली आणि २००९ साली ते आमदार म्हणून निवडून आले. सलग दुसऱ्यांदा आमदार झाल्यानंतर त्यांनी विविध खात्यांचे मंत्रीपद भूषवले आणि प्रशासकीय कामकाजात आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी असलेले सलोख्याचे संबंध, वरिष्ठ नेतृत्वाकडे सिद्ध झालेली निष्ठा आणि प्रदीर्घ अनुभव यामुळे महाराष्ट्र विधान परिषदेच्या सभापतीपदाची जबाबदारी त्यांच्या खांद्यावर आली. आज सभापती म्हणून त्यांना संपूर्ण महाराष्ट्रातील दिनदलित, वंचित, बहुजन समाजातील घटकांच्या विकासासाठी कार्य करण्याची मोठी संधी मिळाली आहे.
गोरगरीब, शोषित, वंचितांच्या प्रश्नांसाठी अहोरात्र झटणारे, तळागाळातील कार्यकर्त्यांना आपलेसे करणारे आणि प्रेमाची वागणूक देणारे नेतृत्व म्हणून रामजी शिंदे साहेब ओळखले जातात. कार्यकर्त्यांच्या सुख-दुःखात सहभागी होणारा नेता हीच त्यांची खरी ओळख आहे. म्हणूनच सर्वसामान्य कार्यकर्ते माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या संघर्षमय प्रवासातून प्रेरणा घेऊन प्रामाणिकपणे वाटचाल करणे हेच योग्य ठरेल असे मनापासून वाटते.
संघर्षातून घडलेले हे नेतृत्व भविष्यात महाराष्ट्राच्या राजकारणात आणखी मोठी भूमिका बजावेल असा विश्वास सर्वसामान्य कार्यकर्त्यांपासून जनतेपर्यंत व्यक्त केला जात आहे.

एक दिवस हेच नेतृत्व महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्रीपद भूषवेल अशी सदिच्छा आणि अपेक्षा सर्वांच्या मनात आहे. अशा या कर्तृत्ववान, लोकाभिमुख आणि प्रेरणादायी नेतृत्वास वाढदिवसाच्या कोटी कोटी हार्दिक शुभेच्छा! त्यांचे आयुष्य आरोग्यदायी, दीर्घायुषी ठरो आणि त्यांच्या हातून महाराष्ट्राच्या जनतेस अधिकाधिक सेवा घडो हीच मनःपूर्वक शुभेच्छा.

