कुकडी आवर्तनातून कोरेगाव गटातील सर्व स्रोत पूर्ण क्षमतेने भरा : पप्पूशेठ धोदाड

कर्जत : प्रा. किरण जगताप

कर्जत तालुक्यातील कोरेगाव जिल्हा परिषद गटातील शेतकऱ्यांनी कार्यकारी अभियंता, कुकडी वितरण बांधकाम विभाग, कोळवडी यांच्याकडे निवेदन सादर करून सुटलेल्या कुकडी आवर्तनातून स्थानिक पाणी स्रोत व तलाव पूर्ण क्षमतेने भरण्याची मागणी केली आहे.

थेरवडी, सोनाळवाडी, तोरकडवाडी, गलांडवाडी, सटवायवाडी, काळेवाडी, कोरेगाव, जळकेवाडी, कापरेवाडी, निंबे, डोंबाळवाडी, आंबिजळगाव, लोणी मसदपूर, शेगुड, म्हाळंगी व अळसुंदे या भागातील शेतकऱ्यांच्या वतीने हे निवेदन देण्यात आले. स्थानिक शेतकऱ्यांनी नमूद केले की थेरवडी तलाव हा या भागातील प्रमुख सिंचन स्रोत आहे आणि तो भरल्यास गहू, हरभरा, मका, कांदा व भाजीपाला पिकांना आवश्यक पाणीपुरवठा शक्य होतो. गेल्या काही वर्षांपासून अनियमित पर्जन्यमान, वाढत्या तापमानाची तीव्रता व वीजपुरवठ्यातील अडचणींमुळे शेती संकटात सापडली आहे. त्यामुळे उपलब्ध आवर्तनाचा काटेकोर वापर करून स्थानिक तलाव व पाझर नाले पूर्ण क्षमतेने भरणे अत्यावश्यक असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

आवर्तन काळात बंधारे तुटणे, कालव्यातील अडथळे आणि गळतीमुळे होणारी पाण्याची नासाडी टाळण्यासाठी यंत्रणांनी विशेष दक्षता घ्यावी अशीही मागणी करण्यात आली. या बाबीकडे प्रशासनाने गंभीरतेने लक्ष देऊन वेळेवर व पुरेसे पाणी सोडावे अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे. स्थानिक शेतकरी प्रतिनिधींनी नमूद केले की या मागणीवर तातडीची व सहानुभूतीपूर्वक कार्यवाही न झाल्यास रब्बी हंगामातील पीक तसेच जनावरांच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होणार आहे.

यावेळी जिल्हा परिषद कोरेगाव गटाचे भाजपा नेते पप्पूशेठ धोदाड, तोरकडवाडीचे माजी सरपंच निलेश धुमाळ, भारतीय जनता पक्षाचे तालुकाध्यक्ष उपाध्यक्ष मंगेश थोरात, थेरवडी विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन पप्पूशेठ राऊत, सचिन धुमाळ, प्रदीप धुमाळ, गोविंद मोरे, दिपक गव्हाणे यांसह अनेक शेतकरी उपस्थित होते.