
कर्जत तालुक्यातील खेड येथील राष्ट्रपिता महात्मा गांधी महाविद्यालयात राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या सुरुवातीला महापुरुषांच्या प्रतिमांचे पूजन करून त्यांना अभिवादन करण्यात आले.

या प्रसंगी मार्गदर्शन करताना विद्यार्थी विकास अधिकारी प्रा. शाहूराव पवार म्हणाले की, राजमाता जिजाऊ यांनी छत्रपती शिवाजी महाराजांसारख्या आदर्श राष्ट्रनायकाचे व्यक्तिमत्व घडवून स्वराज्याची बीजे पेरली. त्यांचे मातृत्व, प्रखर राष्ट्रनिष्ठा आणि ध्येयवाद आजही समाजासाठी प्रेरणादायी आहे. राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी संदीप काळे यांनी स्वामी विवेकानंदांच्या कार्यावर प्रकाश टाकला. स्वामी विवेकानंदांनी युवकांमध्ये आत्मविश्वास, चारित्र्यनिर्मिती आणि राष्ट्रसेवा यांचे महत्त्व अधोरेखित केले असून त्यांचे विचार आजच्या पिढीसाठी दिशादर्शक असल्याचे त्यांनी सांगितले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शितल भोसले यांनी केले तर आभार अमोल जावळे यांनी मानले. याप्रसंगी रमेश जंजिरे, विठ्ठल यादव, अंकुश शेटे यांच्यासह महाविद्यालयातील विद्यार्थी व विद्यार्थिनी उपस्थित होते.




