जीवनातील शेवटच्या क्षणापर्यंत आठवणीत राहणाऱ्या क्षणांपैकी एक एनएसएस शिबिर

कर्जत : प्रा. किरण जगताप

राष्ट्रीय सेवा योजनेच्या शिबिरांमध्ये आलेले अनुभव हे जीवनातील महत्त्वाच्या आठवणीत राहणाऱ्या क्षणांपैकी असतात. ते अखेरपर्यंत स्मरणात राहतात. राष्ट्रीय सेवा योजनेमध्ये सामूहिक पद्धतीने खूप काही शिकण्यास मिळते. येथील लोकांचे विचार, लोककला, जीवन पद्धती, उदरनिर्वाची साधने इत्यादी अनेक बाबींचा परिचय स्वयंसेवकांना या निमित्ताने होत असतो. त्यामुळे स्वयंसेवकांनी सदैव ऊर्जावान राहून राष्ट्रीय सेवा योजनेमध्ये सक्रिय सहभागी व्हायला हवे, असे मत भारतीय समाज विकास व संशोधन संस्थेचे कार्यकारी विश्वस्त डॉ. प्रविण सप्तर्षी यांनी व्यक्त केले. राष्ट्रपिता महात्मा गांधी महाविद्यालय, खेड व सावित्रीबाई फुले विद्यापीठ पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राष्ट्रीय सेवा योजनेच्या शिबीराच्या उद्घाटन समारंभ प्रसंगी कर्जत तालुक्यातील आखोनी येथे ते बोलत होते. २३ ते २९ जानेवारी या कालावधीत हे शिबिर आयोजित करण्यात आले आहे.

या कार्यक्रमाचे उद्घाटक उपसरपंच तुषार सूळ यांनी राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून शिबिरासाठी शुभेच्छा दिल्या. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे बहि:शाल व्याख्याते गोरक्ष भापकर यांनी ’तूच आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार’ या विषयावर व्याख्यान दिले. याप्रसंगी संस्थेचे विश्वस्त आप्पा अनारसे, आदर्श प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष राहुल ढवाण यांनी स्वयंसेवकांना शिबिरासाठी शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमासाठी माजी पंचायत समिती सदस्य मारुती सायकर, सोसायटीचे माजी चेअरमन राजेंद्र भांडवलकर, माजी सरपंच लक्ष्मण सूळ, दिगंबर सायकर, भगवान भांडवलकर, हनुमंत खराडे, नवनाथ खराडे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. दिलीपसिंह निकुंभ, प्राध्यापक, प्राध्यापकेतर कर्मचारी तसेच स्वयंसेवक उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या प्रास्ताविकामध्ये प्राचार्य डॉ. दिलीपसिंह निकुंभ यांनी राष्ट्रीय सेवा योजनेचे महत्त्व तसेच राष्ट्रीय सेवा योजनेच्या श्रमसंस्कार शिबिराचे जीवनामध्ये स्थान व सात दिवसांमध्ये आयोजित श्रमसंस्कार शिबिरामध्ये केल्या जाणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती दिली. सूत्रसंचलन कार्यक्रम अधिकारी प्रा. संदीप काळे यांनी केले तर प्रा. शाहूराव पवार यांनी आभार मानले.