डोळस कार्यकर्त्यांनी थोडे इकडे लक्ष द्या !

कर्जत : प्रा. किरण जगताप

नेत्यांच्या दृष्टीने राजकारणात कार्यकर्त्यांचे स्थान अत्यंत महत्त्वाचे असते. कोणत्याही पक्षाचा किंवा नेत्याच्या यशाचा पाया हे कार्यकर्तेच रचत असतात. कार्यकर्ते हे जनतेच्या मैदानात उतरून प्रचार करतात, लोकांशी संवाद साधतात, आपल्या पक्षाचा, नेत्याचा संदेश घराघरात पोहोचवत असतात. मात्र, अनेकदा नेते हे कार्यकर्त्यांना निवडणुकीच्या काळातच विशेष महत्त्व देतात. निवडणुकीचा काळ सोडून कित्येक नेते हे कार्यकर्त्यांची अडचण, त्यांची मेहनत, त्यांची आर्थिक किंवा सामाजिक परिस्थिती याकडे पूर्ण दुर्लक्ष करतात.

निवडणुका जवळ आल्या की, नेते हे कार्यकर्त्यांना जवळ घेतात, आपुलकीने वागवतात. कार्यकर्त्यांशी गोड बोलतात, त्यांची स्तुती करतात, त्यांना खास अधिकार देतात, वेळप्रसंगी ताटात जेवायला घालतात. यामुळे कार्यकर्त्यांची नेत्याशी भावनिक जवळीकता निर्माण होते आणि ते अधिक उत्साहाने प्रचारात सहभागी होतात.

मात्र, हे सगळे फक्त निवडणुकीपुरतेच असते. एकदा निवडणूक संपली, की त्याच कार्यकर्त्यांना पुन्हा दुर्लक्षित केले जाते. त्यांच्या समस्या, त्यांचे दैनंदिन संघर्ष, आर्थिक अडचणी, कौटुंबिक जबाबदाऱ्या या सगळ्यांकडे नेत्यांचे फारसे लक्ष नसते. निवडणुकीच्या काळात कार्यकर्त्यांच्या भावनांचा वापर केला जातो, पण त्यांचे खरे प्रश्न सोडवण्यासाठी मात्र नेत्यांकडून फारसे प्रयत्न केले जात नाहीत. या परिस्थितीत कार्यकर्त्यांनी डोळसपणे विचार करणे गरजेचे आहे. त्यांनी आपले स्थान आणि आपले महत्त्व ओळखले पाहिजे.

नेत्यांसोबत काम करताना नेत्याची आपल्याबाबतची भूमिका इतर वेळी कशी असते आणि निवडणुकीच्या काळात कशी असते, हे कार्यकर्त्यांनी सूक्ष्मपणे जाणून घ्यावे. केवळ निवडणुकीच्या काळात गोड बोलणे, कौतुक करणे आणि नंतर दुर्लक्ष करणे हे नेत्यांचे वागणे न्याय्य नसते. कार्यकर्त्यांनी या सर्व गोष्टींचे भान ठेवूनच आपली निष्ठा दाखवावी. प्रत्येक कार्यकर्त्याने याकडे डोळसपणे पाहिले तर भविष्यात त्यांच्यावर पश्चातापाची वेळ येणार नाही. डोळस कार्यकर्त्यांना जागृत करणे सोपे असते, त्यात काहीसे यश मिळण्याची शक्यता असते. मात्र नेत्यांच्या अंध कार्यकर्त्यांबाबत लिहिणे, बोलणे हे वर्ज्य करणे, हेच शहाणपणाचे ठरते.