फक्त ‘विकास’ नाही, नेत्याचे वागणेही मतदारांना महत्त्वाचे

कर्जत : प्रा. किरण जगताप

मतदारसंघामध्ये केलेली विकास कामे, एवढीच निवडणुकीतील उमेदवाराचे मूल्यमापन करण्याची कसोटी नसते. मतदार हे नेहमीच नेतृत्वाला वेगवेगळ्या अंगांनी तपासून मतदान करण्याचा निर्णय घेत असतात. निवडणुकीतील उमेदवाराच्या मूल्यमापनातील अनेक मुद्द्यांमधील तो एक मुद्दा आहे, तो नाकारुन चालणार नाही. लोकशाही प्रक्रियेत मतदार हे अनेक घटकांचा विचार करून आपला मतदानाचा निर्णय घेतात. उमेदवाराच्या सार्वजनिक आणि वैयक्तिक आयुष्यातील वर्तणुकीवर त्यांचे लक्ष असते. लोकांना केवळ विकासकामे नाही, तर नेत्याचे एकूण वर्तन, त्याची देहबोली, बोलण्याची पद्धत, जनतेशी असलेले संबंध असे कितीतरी मुद्दे महत्त्वाचे वाटतात. त्यामुळे फक्त विकासाचा बोलबाला करत त्याच्या प्रचारावर भर देणारे नेते निवडणुकीमध्ये नेहमीच यशस्वी होतील हे निश्चित सांगता येत नाही.

प्रत्येक नेता आपली प्रतिमा जनतेसमोर ठेवतो, आणि त्या प्रतिमेवर मतदारांचा निर्णय अवलंबून असतो. जर एखाद्या नेत्यामध्ये अहंकार भरलेला असेल, तो लोकांशी खोटेपणाने वागत असेल, किंवा कोणत्या घटकाला नको ते बोलत असेल, तर लोक त्याच्याकडे पाठ फिरवतात. त्याचप्रमाणे, नेत्याचे सार्वजनिक ठिकाणी बेताल बोलणे किंवा आक्रमक देहबोली हे देखील मतदार नकारात्मकपणे पाहतात. लोक नेत्याच्या संयमाचीही परीक्षा घेतात. जर एखादा नेता सहज चिडतो, तर लोक त्याच्यावर विश्वास ठेवत नाहीत. संयमी आणि विचारशील नेत्याला जनता अधिक मान देते.

नेत्याचे आपल्या कार्यकर्त्यांशी आणि सामान्य लोकांशी वागणूक कशी आहे, हे देखील महत्त्वाचे ठरते. पक्षपातीपणा करणारे, आपलेच कौतुक करणारे आणि इतरांच्या कामाचा आदर न करणारे नेते मतदारांच्या नजरेतून पटकन उतरतात. खोटी आश्वासने देणारे नेते लोकांच्या विश्वासाला पात्र ठरत नाहीत. नेते जे बोलतात ते कृतीत आणतात का, हे मतदार बारकाईने पाहतात. तसेच, नेता लोकांमध्ये मिसळतो का, त्यांच्या समस्या समजून घेतो का, यावरही मतदार निर्णय घेतात. लोकांपासून दूर राहणारे नेते जनतेचा विश्वास गमावतात.

एकूणच, खरा नेता तोच असतो, जो जनतेच्या मनाचा वेध घेतो, त्यांच्याशी प्रामाणिक राहतो, आणि त्यांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी काम करतो. विकासकामे महत्त्वाची असली, तरी त्यासोबतच नेत्याचे व्यक्तिमत्त्व, त्याची वागणूक, आणि जनतेशी असलेले संबंध हे देखील तितकेच महत्त्वाचे असतात. मतदार या सर्व गोष्टींचा विचार करूनच आपला निर्णय घेतात, आणि त्यामुळे फक्त विकासाच्या नावावर निवडणूक जिंकणे शक्य नसते.