कर्जत- जामखेड मतदारसंघातील नेते मंडळींचा धुरळा व सर्वसामान्य जनतेचा विजय : बाळासाहेब कोऱ्हाळे

कर्जत : प्रा. किरण जगताप

कर्जत- जामखेड मतदारसंघातील निवडणुकीत नेतेमंडळींनी आमदार रोहित पवार यांना पाठिंबा न दर्शवता त्यांच्याविरोधात उभ्या राहिले. राम शिंदे यांना मोठ्या प्रमाणावर राजकीय पाठिंबा मिळाला असला, तरी सर्वसामान्य जनतेने रोहितदादा यांना विजयाची संधी दिली. नेत्यांनी त्यांच्या राजकीय ताकदीचा उपयोग करून रोहित पवार यांचा पराभव करण्याचा प्रयत्न केला, मात्र या निवडणुकीने दाखवून दिले की, राजकारणात आता परंपरेपेक्षा लोकांच्या अपेक्षांना महत्त्व आहे. मतदारसंघातील जनतेने नेतेमंडळांचा धुरळा केला असून सर्वसामान्य जनतेचा विजय केला. दुधोडी या गावाने रोहितदादा यांना सर्वाधिक लीड दिलेले असल्याची प्रतिक्रिया दुधोडी येथील कार्यकर्ते बाळासाहेब कोऱ्हाळे यांनी दिली आहे.

कोऱ्हाळे यांनी पुढे म्हटले आहे, आ. रोहितदादा यांचा विजय हा केवळ राजकीय नव्हता, तर तो सर्वसामान्य जनतेच्या विश्वासाचा आणि इच्छाशक्तीचा विजय होता. मतदारसंघातील लोकांनी नेतेमंडळींच्या प्रभावाखाली न राहता विकासपुत्राला मत दिले. यामुळे विकासाला प्राधान्य देणाऱ्या नेतृत्वाला पाठिंबा देण्याची जनतेची भूमिका स्पष्ट झाली. विरोधकांनी या निवडणुकीत कितीही प्रयत्न केले असले, तरी रोहितदादा यांची प्रतिमा एक सक्षम आणि विकासाभिमुख नेता म्हणून अधिक ठळक झाली. नेतेमंडळींच्या पाठिंब्याचा अभाव असूनही, जनतेने आपले मत व्यक्त करत तालुक्यातील राजकीय समीकरणे बदलून टाकली. नेत्यांचा पराभव म्हणजे त्यांच्या ताकदीवरील प्रश्नचिन्ह ठरले, तर आ. रोहित पवार यांच्या यशाने जनतेच्या विश्वासाला योग्य दिशा मिळाली. सर्वसामान्य जनतेच्या या विजयाने राजकारणात नवीन दिशादर्शक पायंडा पाडला आहे. या निवडणुकीत रोहितदादांना मिळालेला विजय हा विकासाचे प्रतीक ठरतो. त्यांनी त्यांच्या कामगिरीने आणि जनहितासाठी केलेल्या प्रयत्नांमुळे मतदारसंघातील लोकांचे मन जिंकले. कर्जत- जामखेड मतदारसंघाने नेत्यांच्या प्रभावाला न जुमानता, विकासाला प्राधान्य दिल्याचे या निकालावरून स्पष्ट असल्याचे कोऱ्हाळे यांनी म्हटले आहे.