रोहित पवार आता तरी आत्मचिंतन करतील का ?

कर्जत : प्रा. किरण जगताप

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीत कर्जत- जामखेड मतदारसंघातून मोठ्या मताधिक्याने विजय मिळवणारे रोहित पवार हे यावेळी निसटत्या मतांनी विजयी झाले. शरद पवारांच्या नातवाला इतक्या नाट्यमय निकालाचा सामना करावा लागणे, ही राजकीय वर्तुळात चर्चा ठरली आहे. निवडणुकीचा हा अनुभव केवळ निकालापुरता मर्यादित राहिला नाही, तर रोहित पवारांच्या राजकीय शैलीवर आणि त्यांच्या नेतृत्वाच्या दृष्टिकोनावरही गंभीर प्रश्न निर्माण करणारा ठरला आहे.

मतदारसंघातील मतदारांचा रोहित पवारांविषयीचा विश्वास अलीकडच्या काळात ढासळल्याचे या निवडणुकीने स्पष्ट केले. मतदारांना आपल्यापर्यंत पोहोचवण्याऐवजी स्वतःला सर्वकाही समजणारे नेते म्हणून प्रस्थापित करण्याचा प्रयत्न त्यांच्या प्रतिमेला घातक ठरला. सभांमधील अत्यंत आक्रमक भाषा, स्थानिक नेत्यांना सुपारीबाज म्हणून हिणवणे, विरोधक उमेदवाराची लायकी काढणे, स्वतःला ‘भावी मुख्यमंत्री’ वगैरे म्हणून मिरवण्याच्या गोष्टी मतदारांना पटल्या नाहीत. अशा प्रकारच्या आत्मघाती दृष्टिकोनामुळे मतदारांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली, आणि रोहित पवारांकडे विकासाच्या अपेक्षेने पाहणाऱ्या लोकांमध्ये नाराजीचा सूर उमटला.

याशिवाय, स्वतःच्या पक्षातील व मित्र पक्षातील स्थानिक नेत्यांना विश्वासात घेऊन निर्णय न घेणे, सर्व नेते व कार्यकर्ते यांना समान वागणूक न देणे, ठराविक नेत्यांशी आणि कार्यकर्त्यांशी दुरावा ठेवणे, मतदारसंघातील प्रसारमाध्यमांना टाळणे अशा अनेक कारणांमुळे त्यांची लोकप्रियता व मताधिक्य कमालीचे घटले. मतदारसंघातील भूमिपुत्र नेत्यांना वेगवेगळ्या उपमा देवून हिणवणे, निष्ठावंत स्थानिक कार्यकर्त्यांना विश्वासात न घेणे, चापलुशी करणाऱ्यांनाच अधिक जवळ करणे, यामुळे रोहित पवारांचा जनतेतील प्रभाव कमी झाला.

आजच्या राजकारणात नम्रता आणि सर्वसमावेशकता हे नेत्याच्या यशासाठी महत्त्वाचे घटक ठरतात. मात्र, रोहित पवारांच्या कार्यपद्धतीत ते स्पष्टपणे दिसले नाही. अहंकाराने भारलेले नेतृत्व आणि अतिआत्मविश्वासाने भरलेले निर्णय हे त्यांच्या राजकीय प्रवासासाठी अपायकारक ठरले आहेत. निवडणुकीत चुरशीचा सामना करावा लागणे आणि त्यातून निसटता विजय मिळवणे, हे त्यांच्यासाठी मोठा धडा आहे. रोहित पवार हे याला ‘धडा’ मानतात का ? हाही खरा प्रश्न आहे. कारण आतापर्यंत रोहित पवारांच्या चुकांवर बोट ठेवून लेखन करणाऱ्या पत्रकारांना त्यांचे कार्यकर्ते ‘भाजपाचा पत्रकार’ असा शिक्का मारून बाजूला करतात. त्याला रोहित पवारांची मुकसंमती असल्याचे वारंवार जाणवते. त्यांच्याभोवती फक्त स्तुतीपाठकांचेच लोंढे वाहत असल्याने दुसरी बाजू कधीच त्यांच्यावर कानावर पडत नाही. कदाचित त्यांना ती पसंत नसावी. हलक्या कानाच्या नेत्यांमध्ये रोहित पवार हे तंतोतंत बसतात, असाही अनुभव अनेकदा येतो.

खरे तर, निवडणुकीच्या निकालाने रोहित पवारांसाठी आत्मचिंतनाची संधी उपलब्ध करून दिली आहे. जर त्यांनी या अनुभवातून बोध घेतला, तर त्यांना आपल्या राजकीय प्रवासाला नवी दिशा देण्याचा अवसर मिळेल. सर्व समाज घटकांना विचारांनी सोबत घेणे, सर्वपक्षीय नेत्यांचा सन्मान राखणे आणि अहंकाराला बाजूला ठेवून काम करणे या गोष्टी भविष्यात त्यांच्या राजकीय यशासाठी मार्गदर्शक ठरतील. हा निकाल म्हणजे त्यांच्यासाठी इशारा आहे. लोकशाहीत लोकांचा आशीर्वाद मिळवण्यासाठी केवळ नातेवाईक असण्याचा उपयोग होत नाही, तर लोकांच्या मनातील स्थान टिकवण्यासाठी पदोपदी प्रयत्न होणे गरजेचे असते. या निकालातून रोहित पवार हे आत्मचिंतन करतील आणि स्वतःमध्ये काही बदल करून नव्या जोमाने कामाला लागतील, अशी आशा वाटते.