
कर्जत येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दुर्लक्षामुळे कर्जत- कुळधरण मार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोठ्या समस्यांचा सामना करावा लागत आहे. बांधकाम विभागाकडून प्रवाशांच्या माहितीसाठी रस्त्याच्या दुतर्फा लावलेले अनेक माहिती फलक हे झाडेझुडपांमध्ये अडकून गेले आहेत.


या फलकांवरील संदेश स्पष्टपणे वाचता येत नसल्याने वाहनचालक आणि प्रवाशांना मार्गदर्शन मिळत नाही. रस्त्याच्या कडेला गावांचे अंतर दर्शविणारे स्टोन्स हे गवत, वेली यामध्ये दडलेले दिसत आहेत. वेगमर्यादा तसेच वळण रस्त्याची माहिती देणारे अनेक फलक जमीनदोस्त झालेले आहेत. त्यामुळे चालकांना रस्ता समजून घेण्यात अडचणी येत असून अपघाताचे प्रमाण वाढलेले आहे.
या मार्गावर अनेक ठिकाणी साईड पट्ट्या खचलेल्या आहेत. साईड पट्ट्यांची खचलेली स्थिती गंभीर अपघातांचे कारण ठरत आहे. रात्रीच्या वेळी अंधारात प्रवास करताना ही समस्या अधिकच गंभीर होत आहे. काही ठिकाणी साईड पट्ट्या भरण्याचे काम केलेले आहे, मात्र रस्त्याच्या जवळचीच माती व मुरूम साईड पट्ट्यांवर टाकून रस्त्यालगत खड्डे केल्याने अपघाताचा धोका अधिकच वाढला आहे. या मार्गावर काही दिवसांपूर्वीच एसटी बस अपघातग्रस्त झाली होती.

सार्वजनिक बांधकाम विभागाचे या प्रश्नाकडे पूर्ण दुर्लक्ष असल्याचे दिसत आहे. त्यामुळे या मार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांकडून संताप व्यक्त केला जात आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अभियंत्यांनी तालुक्यातील रस्त्यांची पाहणी करून त्यावर योग्य अंमलबजावणी करण्याची गरज आहे. मात्र विभागाकडून योग्य दखल घेतली जात नसल्याचे चित्र दिसत आहे. गेंड्याची कातडी धारण केलेल्या बांधकाम विभागाला कधी जाग येते ? हे पाहणे महत्त्वाचे आहे.
क्रमशः दुसऱ्या भागात
