कर्जतच्या सार्वजनिक बांधकाम विभागाचा ‘निर्लज्जम कारभार’

कर्जत : प्रा. किरण जगताप

कर्जत- राशीन महामार्गावरील रस्त्याच्या बांधकामातील हलगर्जीपणामुळे प्रवाशांची सुरक्षा धोक्यात आली आहे. महामार्गाचे विस्तारीकरण होताना त्याबरोबर सर्व पुलांचे रुंदीकरण होणे अपेक्षित होते. मात्र ठेकेदाराने अनेक पुलांचे रुंदीकरण केले नाही. त्यामुळे अनेक ठिकाणी रस्त्याची रुंदी जास्त आणि पुलाची रुंदी कमी अशी परिस्थिती दिसत आहे. त्यामुळे टू व्हीलर ट्रॅकवरून जाताना रस्ता अचानक बंद होऊन तो पुलाजवळच्या खड्ड्यात घेवून जात आहे.

सार्वजनिक बांधकाम विभागाने अद्यापपर्यंत याची कसलीच दखल घेतली नसल्याने अनेक दुचाकीस्वारांना जीवाला मुकावे लागत आहे. कर्जत येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दुर्लक्षामुळे हा महामार्ग अपघातासाठी ओळखला जाऊ लागला आहे.

सार्वजनिक बांधकाम विभागाच्या देखरेखीखाली महामार्गाचे काम पूर्ण करण्यात आले असले तरी पुलाचे बांधकाम अद्याप अपूर्ण राहिले आहे. ठेकेदाराने पुलाचे काम पूर्ण न करता ते अर्धवट सोडले आहे. प्रवाशांच्या माहितीसाठी येथे रिफ्लेक्टरही (परावर्तक) बसवण्यात आलेले नाहीत. दुचाकीस्वार आणि अन्य प्रवाशांना या अरुंद पुलावरून जाताना जीव धोक्यात घालावा लागत आहे. अपूर्ण कामांमुळे वाहनचालकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष आणि ठेकेदाराने दाखवलेला हलगर्जीपणामुळे प्रवाशांचा जीव धोक्यात आलेला आहे.

क्रमशः तिसऱ्या भागात