
कर्जत तालुक्यातील राशीन – खेड महामार्गावर करमणवाडी फाटा येथे पुलाजवळ रिफ्लेक्टर बसवण्यात आले नसल्याने अपघात झाला. ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरचा ट्रेलर पलटी होऊन हा अपघात झाला. पुलावर रिफ्लेक्टर नसल्यामुळे चालकाला पुलाचा अंदाज न आल्याने रात्री हा अपघात झाला आहे. विशेष म्हणजे, या पुलाला कठडेही नसल्याने कर्जतच्या सार्वजनिक बांधकाम विभागाची चूक अधोरेखित होत आहे.

या महामार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहन चालकांना पुलावरून जात असताना अनेक पुलांजवळ रिफ्लेक्टर बसवण्यात आले नसल्याने पुल असल्याची माहिती मिळत नाही. रस्ता संपल्यानंतर साईड पट्टी आहे असे गृहीत धरून चालक वाहने रस्त्याच्या खाली घेतात आणि मोठा अपघात होतो.
कर्जत येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या देखरेखीखाली अनेक वर्षे रेंगाळून रस्ता विस्तारीकरण व पुलांची कामे झालेली आहेत. मात्र ठेकेदार पोसण्यासाठी बांधकाम विभागाने अनेक बाबींकडे दुर्लक्ष केले. त्याचा परिणाम म्हणून या महामार्गावर कित्येकांना आपला जीव गमवावा लागत आहे. रात्री झालेल्या अपघातात ट्रेलर तसेच शेतकऱ्याने मोठ्या परिश्रमातून उत्पादन केलेल्या उसाचे प्रचंड नुकसान झाले. पुलावर सुरक्षिततेसाठी आवश्यक असलेले रिफ्लेक्टर बसवण्यात आले नसल्यामुळे हा अपघात घडल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
क्रमशः चौथ्या भागात