राशीन मार्गालगत निजलाय कर्जतचा सार्वजनिक बांधकाम विभाग !

कर्जत : प्रा. किरण जगताप

प्रवाशांना गावांच्या अंतराची माहिती होण्यासाठी रस्त्याच्या दुतर्फा किलोमीटर स्टोन्स उभारले जातात. मात्र कर्जत- राशीन- खेड महामार्गालगत उभारलेले कित्येक किलोमीटर स्टोन्स व इतर स्टोन्स आडवे पडलेले दिसत आहेत. तर अनेक ठिकाणचे स्टोन्स गायब झालेले आहेत. अनेक महिन्यांपासून रस्त्यालगत हीच स्थिती पाहायला मिळत असल्याने प्रवाशांना गावांचे अंतर आणि दिशांची माहिती मिळत नाही. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या ढिसाळ कारभारामुळे प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.

या महामार्गाच्या देखभाल- दुरुस्तीची जबाबदारी ठेकेदारावर सोपवण्यात आली असली तरी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून ठेकेदाराला योग्य त्या सूचना दिल्या जात नाहीत का ? हा प्रश्न उपस्थित होत आहे. परिणामी, रखडलेली कामे आणि रस्त्यालगतची दुरुस्ती अधांतरीच राहत आहे. काही ठिकाणी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या हद्दीत अतिक्रमणे झाल्यामुळे मोठ्या प्रमाणात दिशादर्शन अडथळित होत आहे. अनेक ठिकाणी पुलानजीकचे स्टोन्स गायब झालेले आहेत. याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचे चित्र दिसत आहे.

लाखो रुपयांचा खर्च करून उभारलेले हे दिशादर्शक फलक आणि किलोमीटर स्टोन्स प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी महत्त्वाचे आहेत. मात्र कर्जतच्या सार्वजनिक बांधकाम विभागातील उपअभियंता व इतर अधिकाऱ्यांच्या बेजबाबदारपणामुळे या सुविधांचा मूळ उद्देश हरवत चालला आहे. वाहतूक व्यवस्था अधिक सुलभ व्हावी म्हणून उभारण्यात आलेले स्टोन्स व माहिती फलक तातडीने योग्य स्थितीमध्ये बसवण्याची आवश्यकता आहे.

बांधकाम विभागाच्या दुर्लक्षामुळे या महामार्गावर कित्येक अपघात घडत आहेत. अनेकांना आपला जीव गमवावा लागत आहे. देखभाल व दुरुस्तीची कामे वेळेत होत नसल्यामुळे नवख्या प्रवाशांची मोठ्या प्रमाणावर गैरसोय होत आहे. अधिकाऱ्यांचे ठेकेदाराबरोबरचे लागेबांधे हे प्रवाशांच्या मुळावर येत आहेत. बांधकाम विभागाचे अधिकारी या प्रश्नांकडे संवेदनशील पद्धतीने पाहून प्रवाशांना न्याय देतील काय ?

क्रमशः पाचव्या भागात