
परभणी येथे झालेल्या घटनेचा कर्जत तालुका रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) यांच्या वतीने तीव्र निषेध नोंदवण्यात आला. यासंदर्भात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया कर्जत तालुका अध्यक्ष सतीश भैलुमे व पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी सोमवारी, ( दि. १६) कर्जतचे पोलीस निरीक्षक आणि तहसीलदार यांना निवेदन दिले.

दि. १० डिसेंबर २०२४ रोजी परभणी येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एका समाजकंटकाने महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोरील संविधान प्रतिमेची तोडफोड करून ती विटंबना केली. या कृत्याचा कर्जत तालुका रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) यांच्यातर्फे जाहीर निषेध करण्यात येत आहे. संबंधित व्यक्तीवर त्वरित देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
तसेच, सोमनाथ सूर्यवंशी या दलित तरुणाचा परभणी न्यायालयीन कोठडीत, पोलीस खात्याच्या हलगर्जीपणामुळे झालेला मृत्यू अत्यंत गंभीर असून, त्याची सीआयडीमार्फत सखोल चौकशी करण्यात यावी आणि दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी.
याशिवाय, पोलिसांनी निरपराध भीमसैनिकांवर दाखल केलेले सर्व गुन्हे तात्काळ मागे घ्यावेत, अशीही मागणी करण्यात आली आहे. या मागण्या सरकारपर्यंत पोहोचवण्याची गरज असल्याचे सतीश भैलुमे यांनी स्पष्ट केले आहे. या घटनांच्या निषेधार्थ मंगळवार, दि. १७ डिसेंबर रोजी कर्जत बंदची हाक देण्यात आली आहे.
यावेळी धनंजय कांबळे, अक्षय भैलुमे, नागेश घोडके, देवा खरात, रुपेश म्हस्के आणि नितेश बापट उपस्थित होते.
राहुल अडसूळ, कर्जत तालुका प्रतिनिधी