
कर्जत- खेड महामार्गावर सार्वजनिक बांधकाम विभागाकडून प्रवाशांच्या सोयीसाठी लाखो रुपयांचा खर्च करून दिशादर्शक फलक बसवण्यात आले आहेत. याचा उद्देश प्रवाशांना गावांची माहिती व अंतर सहज मिळावे हा आहे. मात्र विभागातील अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे या फलकांचा मूळ उद्देश हरवत चालला आहे.

गेल्या दीड- दोन वर्षांपासून या फलकांवर वारंवार राजकीय जाहिराती, अभिनंदन संदेश आणि इतर व्यावसायिक फलक लावण्यात येत असल्यामुळे प्रवाशांना महत्त्वाची माहिती मिळत नाही. शासनाने जनतेच्या सेवेसाठी ठेवलेले कागदी पाटील मात्र भव्य अशा अनेक शासकीय माहिती फलकांवर खासगी जाहिरात लावल्याच्या बदल्यात हात ओले करत भाडे खात असल्याची तालुक्यात जोरदार चर्चा सुरु आहे.
प्रवाशांच्या सोयीसाठी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून माहिती फलक उभारणीसाठी मोठ्या प्रमाणावर खर्च केला जातो. मात्र कर्जत तालुक्यात माहिती फलकांची योग्य देखभाल आणि वापर होताना दिसत नाही. अनेक ठिकाणी फलकांवर जाहिरातींचे अतिक्रमण सुरू आहे. प्रवाशांना फलकांवरील गावांची, पर्यटन स्थळांची नावे, त्यांचे अंतर दिसणे हे आवश्यक आहे. मात्र आता तिथे विविध राजकीय पक्षांचे नेते व कार्यकर्त्यांच्या फोटोंसह बॅनर लावलेले दिसत आहेत. अनेकदा यावर अभिनंदन संदेश व इतर जाहिराती लावत मूळ माहिती झाकली जात आहे. यामुळे वाहनचालक व प्रवाशांना दिशादर्शनाची आवश्यक माहिती मिळत नाही.
महामार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी याबाबत वारंवार तक्रारी केल्या, मात्र विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी याकडे दुर्लक्ष करत आहेत. काही कर्मचाऱ्यांच्या चुकीच्या कार्यपद्धतीमुळे हे अतिक्रमण होत असल्याची चर्चा आहे. फलकावरील जागेचा व्यावसायिक हेतूसाठी वापर करायला देताना विभागाकडून छुप्या पद्धतीने भाडे आकारले जात असल्याची चर्चा आहे. महामार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहनचालकांना योग्य दिशादर्शन न मिळाल्यामुळे प्रवासात विलंब होतो, तर काही वेळा चुकीच्या दिशेने प्रवास होण्याचा प्रकार घडतो. प्रशासनाच्या या कार्यपद्धतीवर प्रवाशांकडून प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
प्रवाशांच्या सोयीसाठी उभारलेल्या फलकांचा मूळ उद्देश पुन्हा जागा करण्यासाठी प्रशासनाने अतिक्रमण झालेल्या फलकांची माहिती घेणे गरजेचे आहे. फलकावरील अनावश्यक जाहिराती आणि राजकीय बॅनर त्वरित हटवून, भविष्यात अशा प्रकारच्या अतिक्रमणावर निर्बंध आणण्याची गरज आहे. आणावेत. मात्र निद्रितावस्थेतील बांधकाम विभाग याकडे लक्ष देवून आपले कर्तव्य बजावेल का ? हा प्रश्न आहे. कर्जतच्या सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता प्रशांत वाकचौरे हे आपल्या विभागाचे होत असलेले वस्त्रहरण गांभीर्याने घेतात का ? हे पाहणे महत्वाचे आहे.
क्रमशः सहाव्या भागात