
पत्रकारिता क्षेत्रामध्ये विविध माध्यमातून करिअरच्या अनेक संधी उपलब्ध आहेत. दृक, श्राव्य आणि दृकश्राव्य या सर्वच प्रसारमाध्यमांचा आवाका दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांना पत्रकारितेमध्ये रस आहे ते या क्षेत्रात येऊ शकतात. कोणत्याही गोष्टीची जिज्ञासा, चिकित्सक विचार, सामाजिक प्रश्न धाडसाने मांडण्याचे कौशल्य असलेले युवक या क्षेत्रात यशस्वी होऊ शकतात. त्यामुळे विद्यार्थ्यांनी आपल्यातील उपजत कौशल्ये तपासून या क्षेत्रामध्ये यावे, असे प्रतिपादन कर्जत तालुका प्रेस क्लबचे सचिव प्रा. सोमनाथ गोडसे यांनी केले.

कर्जत तालुक्यातील अंबिकानगर येथील पद्मभूषण कै. वसंतदादा पाटील उच्च माध्यमिक विद्यालय आयोजित राष्ट्रीय सेवा योजनेच्या गणेशवाडी येथील शिबिरात ‘पत्रकारितेतील करिअरच्या संधी’ या विषयावर ते बोलत होते. मंचावर राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्रा. अकबर सय्यद, प्रा. धनंजय थेटे, प्रा. मिरा देवकर, प्रा. किरण जगताप, मिलिंद पावणे हे उपस्थित होते.

प्राचार्य नानासाहेब सुद्रिक, पर्यवेक्षक चंद्रकांत बेद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली १७ ते २३ डिसेंबर या कालावधीत हे शिबिर संपन्न होत आहे. या शिबिरामध्ये विविध मान्यवरांची व्याख्याने, श्रमदान तसेच विविध गुणदर्शनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे. प्रा. धनंजय थेटे यांनी प्रास्ताविक व सूत्रसंचालन केले. प्रा. अकबर सय्यद यांनी आभार मानले. राष्ट्रीय सेवा योजनेचे शिबिरार्थी, जिल्हा परिषद शाळेचे विद्यार्थी यावेळी उपस्थित होते.
पत्रकारितेतून सामाजिक बांधीलकी जपण्याची संधी : प्रा. किरण जगताप
‘पत्रकारिता आणि सामाजिक बांधिलकी’ या विषयावर बोलताना प्रेस क्लबचे अध्यक्ष प्रा. किरण जगताप म्हणाले, सामाजिक कार्याची आवड असणाऱ्यांसाठी पत्रकारितेच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकी जपण्याच्या विविध संधी उपलब्ध होतात. समाजातील उपेक्षित, वंचित, पीडित लोकांचे प्रश्न जनतेसमोर मांडून त्यांना न्याय देता येतो. सामाजिक न्यायासाठी लढा देण्याचे काम पत्रकारितेतून करता येते. जनतेचे ज्वलंत प्रश्न प्रभावीपणाने मांडून पत्रकार हे सामाजिक बांधिलकी जपत असतात.