राशीन महामार्गावरील ३५ पुलांजवळ रिफ्लेक्टरचा अभाव ; बांधकाम विभाग झोपा काढतोय ?

कर्जत : प्रा. किरण जगताप

कर्जत- राशीन- खेड महामार्गावरील सुमारे ३५ पुलांवर रिफ्लेक्टर बसवलेले नसल्याने अपघातांचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. रात्रीच्या वेळी या महामार्गावरून प्रवास करताना पुलांचा अंदाज न आल्याने वाहनांचे अपघात होत आहेत. छोट्या मोठ्या पुलांजवळ रिफ्लेक्टर बसवणे बंधनकारक असले तरी ठेकेदाराकडून ते बसवण्यात आलेले नाहीत. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दुर्लक्षामुळे या महामार्गावर वारंवार अपघातांची पुनरावृत्ती होत आहे.

या महामार्गावर अनेक पुलांजवळ रिफ्लेक्टर तसेच कठडे नसल्याने वाहनचालकांना पूल आल्याची माहिती मिळत नाही. अनेक पुलांजवळ संरक्षक गार्ड स्टोन्सही बसवण्यात आलेले नाहीत. खराब झालेला रस्त्ता आणि महामार्गावरील अनेक जीर्ण झालेले पूल वाहनचालकांसाठी धोकादायक ठरत आहेत.

बरेच पूल हे साईड पट्ट्यांवरच आल्याने अनेक वाहने अपघातग्रस्त होत आहेत. दुचाकी तसेच चार चाकी वाहने पुलाला धडकून तसेच पुलाखाली कोसळून अपघात होत आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागाने या महामार्गावर लक्ष न दिल्यामुळे ठेकेदारांकडून देखभालीचे काम वेळेत होत नाही. महामार्गाचे काम करताना काही ठिकाणी नवीन पुलांची उभारणी करण्यात आलेली नाही. त्यामुळे कठडे नसलेल्या व जीर्ण पुलांचा वापर सुरू आहे.

अनेक पुलांजवळ रिफ्लेक्टर बसवलेले नसल्यामुळे वाहनचालकांना जीवघेणा धोका निर्माण होत आहे. महामार्गावर रिफ्लेक्टर बसवण्यासह सुरक्षेच्या विविध उपाययोजना करणे तसेच पुलांना कठडे उभारून त्यांचे मजबुतीकरण करण्याची आवश्यकता आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने या बाबींकडे गांभीर्याने लक्ष देऊन तात्काळ उपाययोजना करून घेण्याची आवश्यकता आहे.

क्रमशः सातव्या भागात