अळसुंदे हायस्कूलमध्ये ज्ञानरचनावादी पद्धतीने इंडक्शन मोटरविषयी मार्गदर्शन

कर्जत : प्रा. किरण जगताप

कर्जत तालुक्यातील अळसुंदे येथील न्यू इंग्लिश स्कूलमध्ये बुधवारी इयत्ता नववीच्या इंग्रजी विषयाच्या ग्रेट सायंटिस्ट या पाठातील मायकल फॅरेडे यांनी संशोधित केलेल्या संपूर्ण विश्वाला वरदान ठरणाऱ्या इंडक्शन मोटरची प्रत्यक्ष माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आली. इंडक्शन मोटरची रचना, कार्यपद्धती व प्रकार याविषयी अळसुंदे येथील मोटार इलेक्ट्रिशियन अण्णा दिंडोरे यांनी विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष अनुभूती देत मार्गदर्शन केले.

विद्यालयाचे मुख्याध्यापक रामदास परहर यांनी ज्ञानरचनावादी पद्धतीने अध्यापन केल्याने निरीक्षणाद्वारे ज्ञानप्राप्ती सहज करता येते असे प्रतिपादन केले. विद्यालयाचे इंग्रजी विषय शिक्षक सुनील गोरखे यांनी इंग्रजी विषयाचा इतर विषयाशी असणारा सहसंबंध स्पष्ट करताना शिक्षणाला परिणामकारक आणि परस्परसंवादी बनवण्यासाठी शैक्षणिक साधनांसह नवनवीन तंत्रे एकत्र करून ज्ञानरचनावादी अध्ययन अध्यापन पद्धतीचा अवलंब करत आनंददायी शिक्षण प्राप्त करण्यासाठी विद्यालय सतत कार्यरत असल्याचे सांगितले. इयत्ता दहावीच्या विज्ञान विषयातील इंडक्शन मोटर विषयी असणाऱ्या पाठातील संबोध याद्वारे स्पष्ट झाल्याचे विज्ञान शिक्षक प्रवीण कांबळे यांनी सांगितले. यावेळी विद्यार्थ्यांनी आपल्या मनातील शंकांचे निरसन तज्ञ मार्गदर्शक अण्णा दिंडोरे यांच्याकडून करून घेतले. त्यामध्ये प्रामुख्याने जलपरी मोटर पाण्यामध्ये असूनही त्यामधून इलेक्ट्रिक शॉक का लागत नाही?, मोटार जळते म्हणजे काय होते?, मोटर भरण्याची प्रक्रिया कशी असते?, इलेक्ट्रिक इंडक्शन मोटरमधील स्टेटर, रोटर, कॅपॅसिटर व कॉपर वायरचे कार्य आदी शंकांचे समाधान करण्यात आले.

या उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी ज्येष्ठ शिक्षक मोहन बनसुडे, रवींद्र विधाते व नितीन जगताप यांचे विशेष मार्गदर्शन लाभले. केवळ पुस्तकी औपचारिक शिक्षण न देता व्यावसायिक शिक्षण प्रत्यक्ष कृतीतून ज्ञानरचनावादी पद्धतीने विद्यार्थ्यांना देण्याच्या विद्यालयाच्या या प्रयत्नाबद्दल सर्व पालक व परिसरातील शिक्षण प्रेमी नागरिकांनी विद्यालयाचे मुख्याध्यापक रामदास परहर व इंग्रजी भाषा शिक्षक सुनील गोरखे, विज्ञान विषय शिक्षक प्रवीण कांबळे व विद्यालयाच्या सर्वांगीण विकासात पालकाचे महत्त्वाचे स्थान दर्शवणारे तज्ञ मार्गदर्शक अण्णा दिंडोरे यांचे अभिनंदन केले.