कर्जतच्या मस्तीखोर बांधकाम विभागामुळे प्रवाशांचा जीव धोक्यात !

कर्जत : प्रा. किरण जगताप

कर्जत- राशीन- खेड महामार्गावरील साईड पट्ट्यांची दुरवस्था आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या निष्काळजी कारभारामुळे या मार्गावर अपघातांची संख्या झपाट्याने वाढत आहे. साईड पट्ट्यांवर अनेक ठिकाणी मोठ्या आकाराचे दगड गोटे पडलेले असून त्यामुळे वाहनचालकांना अडथळा निर्माण होत आहे. या महामार्गावर अनेक ठिकाणी साईड पट्ट्या खचल्या आहेत, तर काही ठिकाणी खोल चाऱ्या पडलेल्या आहेत. साईड पट्ट्यांच्या या दुरावस्थेमुळे वाहनांचे मोठ्या प्रमाणावर अपघात होत असून अनेकांना जीव गमवावा लागत आहे.

महामार्गालगत काही खासगी कामांसाठी साईड पट्ट्या खोदल्या गेल्या असून त्याचा वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे. साईड पट्ट्यांवर झाडे- झुडपे वाढल्याने समोरून येणारी वाहने दिसत नाहीत, परिणामी अपघातांचे प्रमाण वाढलेले आहे. काही ठिकाणी दगड, मातीचे ढीग, झाडांच्या फांद्या पडलेल्या आहेत. यामुळे वाहनचालकांना अपघातांचा सामना करावा लागत आहे.

राशीन येथे फुटपाथचे निकृष्ट दर्जाचे काम झाल्यामुळे पादचाऱ्यांना चालण्यास त्रास होत आहे. फुटपाथवरील अडथळ्यांमुळे नागरिकांना सुरक्षित मार्ग मिळत नाही, तर वाहनचालक आणि पादचाऱ्यांमध्ये अपघात होत आहेत. याशिवाय, साईड पट्ट्यांवरील अतिक्रमणामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत असून, वाहनांना योग्य जागा न मिळाल्याने प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहे.

सार्वजनिक बांधकाम विभागाच्या हलगर्जीपणामुळे या मार्गावरील परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर बनत चाललेली आहे. साईड पट्ट्यांची दुरुस्ती आणि अतिक्रमण काढण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यात आलेल्या नाहीत. बांधकाम विभागाचे हे दुर्लक्ष प्रवाशांच्या जीवावर बेतत असून अपघातांमुळे अनेक कुटुंबांचे जीवन उद्ध्वस्त होत आहे.

महामार्गाच्या देखभालीसाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने पावले उचलण्याची गरज आहे. साईड पट्ट्यांवरील अडथळे काढून त्यांची योग्य दुरुस्ती केल्याशिवाय या महामार्गावरील अपघातांचे प्रमाण कमी होणार नाही. मात्र, ठेकेदाराकडून टक्केवारी मिळवण्याच्या नादात जनतेच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करणाऱ्या बांधकाम विभागाची मस्ती दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे.

क्रमशः आठव्या भागात