‘भाडखाऊ’ सार्वजनिक बांधकाम विभागाची झालीय कोंडी, मुदतीआधी फ्लेक्स काढला तर ते बसतील बोकांडी ?

कर्जत : प्रा. किरण जगताप

कर्जत- राशीन- खेड महामार्गावर प्रवाशांच्या माहितीसाठी दिशादर्शन होण्याच्या उद्देशाने सार्वजनिक बांधकाम विभागाने लाखो रुपयांचा खर्च केला. परंतु, या फलकांचा मूळ उद्देश पूर्ण न होता, त्यावर अभिनंदन संदेश, राजकीय नेत्यांच्या छायाचित्रांसह जाहिराती दिसून येत आहेत. यामुळे प्रवाशांना आवश्यक माहिती मिळत नाही, आणि फलकांवरील माहितीचा हेतू साध्य होताना दिसत नाही.

‘कर्जत लाईव्ह’च्या माध्यमातून प्रवाशांच्या या प्रश्नावर आवाज उठवण्यात आला. त्यानंतर सोशल मीडियातून नागरिकांनी सार्वजनिक बांधकाम विभागाची अब्रू चव्हाट्यावर आणली. तरीही बेफिकीर असलेल्या सार्वजनिक बांधकाम विभागाने यावर अपेक्षित कारवाई केली नाही. या प्रकारात मोठे गौडबंगाल असल्याची चर्चा राशीन भागात उमटत आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या तथाकथित बांडगुळांनी शासकीय फलकावर खासगी फ्लेक्स लावण्याच्या बदल्यात आगाऊ माल घेतल्याची चर्चा आहे. जेवढ्या महिन्यांच्या मुदतीचा आगाऊ माल स्वीकारला तेवढे दिवस हे फ्लेक्स हटवले जाणार नसल्याची धक्कादायक चर्चा परिसरात सुरू आहे. त्यामुळे फ्लेक्स हटवण्याबाबत कोंडी झाल्याचे जनतेतील चर्चेतून समोर येत आहे.

निर्लज्जपणाचा कळस करत सार्वजनिक बांधकाम विभागात अशी बांडगुळे कोणाच्या आशीर्वादाने पोसली जात आहेत ? हा खरा प्रश्न आहे. जनतेच्या सेवेसाठी उभारलेल्या फलकांचा चुकीच्या पद्धतीने वापर होत आहे. यामुळे प्रवाशांना दिशादर्शनाऐवजी संभ्रमाचा सामना करावा लागत आहे. फलकांवरील अनावश्यक मजकूर, व्यावसायिक जाहिराती आणि राजकीय फलकांमुळे महामार्गावरील प्रवाशांची गैरसोय होत आहे. मुर्दाड बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता प्रशांत वाकचौरे हे या प्रकाराची दखल घेत नसल्याने या प्रकाराला नेमके कोण खतपाणी घालत आहे ? हे प्रवाशांना समजू शकत नाही. जनतेच्या नजरेतून ‘भाडखाऊ’ झालेल्या या विभागाला नेमकी कधी जाग येईल ?

क्रमशः नवव्या भागात !