
ग्रामीण भागातील समाज अजूनही अनेक बाबतीत पारंपरिक विचारसरणी आणि अंधश्रद्धांवर आधारित आहे. शिक्षण तसेच वैज्ञानिक दृष्टिकोनाचा अभाव, आर्थिक दुर्बलता, जीवनातील अनिश्चितता या आणि अशा घटकांचा ग्रामीण समाजावर मोठा परिणाम झालेला दिसतो. या परिस्थितीचा गैरफायदा घेत, बुवा- बाबा, स्वयंघोषित गुरु आणि जादूटोणा करणारे लोक आपली मुळे खोलवर रुजवतात. त्यांच्या हातात चमत्कारी उपायांची जादूची कांडी आहे, अशी भावना लोकांमध्ये पद्धतशीरपणे तयार केली जाते. त्यालाच ग्रामीण जनता बळी पडते.

हे बुवा- बाबा लोकांच्या श्रद्धेचा, भीतीचा आणि अज्ञानाचा फायदा घेतात. एखाद्या कुटुंबात आजारपण आले, शेतीत नुकसान झाले किंवा कौटुंबिक समस्या निर्माण झाल्या तर हे बुवा ‘देवाचा कोप’, ‘जादूटोणा’ किंवा ‘कर्मफळ’ याकडे दोष ढकलतात. मग त्यावर ‘विशेष उपाय’ म्हणून महागड्या पूजा, यज्ञ, तांत्रिक विधी यांचे आयोजन करून लोकांकडून मोठ्या प्रमाणात पैसे उकळले जातात. अनेकदा महिलांचे लैंगिक शोषण, मुलींचे भावनिक शोषण, आर्थिक फसवणूक, तसेच काही ठिकाणी हिंसक घटनाही घडलेल्या दिसतात.
ही समस्या केवळ अंधश्रद्धेची नाही, तर ती सामाजिक, मानसिक आणि आर्थिक दृष्टिकोनातूनही आहे. त्यामुळे यावर उपाय शोधताना केवळ बुवा- बाबांवर बंदी घालणे पुरेसे ठरत नाही. समाजात वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित करणे अत्यावश्यक आहे. शालेय शिक्षणात केवळ पुस्तकी ज्ञान न देता वैज्ञानिक विचारसरणीला प्रोत्साहन देणे, हे या समस्येवरील दीर्घकालीन उपाय ठरू शकते. स्थानिक स्वराज्य संस्था, सामाजिक कार्यकर्ते, आणि स्थानिक नेते यांनी अंधश्रद्धेविरुद्ध ठाम भूमिका घेतली पाहिजे. मात्र तसे होताना दिसत नाही. अनेक सुशिक्षित लोक हेच अंधश्रद्धेचे वाहक बनतात. शिक्षणातून व्यक्तींमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण होतोच असे नाही. त्यामुळे सुशिक्षितांच्या अंधश्रद्धा हा अभ्यासाचा वेगळा विषय बनतो.
बुवा- बाबांपासून जनतेला वाचवण्यासाठी माध्यमांची जबाबदारीही महत्त्वाची आहे. केवळ अशा घटना बातम्यांमध्ये दाखवून थांबण्याऐवजी, अंधश्रद्धेविरुद्ध जनजागृती मोहीम राबवण्याची खरी गरज आहे. अंधश्रद्धा निर्मूलन कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करत समाजात वैज्ञानिक दृष्टिकोनाला प्रोत्साहन देणारे उपक्रम शासकीय स्तरावर राबवायला हवेत.
प्रत्येक व्यक्तीने स्वतःला प्रश्न विचारला पाहिजे – मी कोणावर विश्वास ठेवतोय ? माझ्या समस्यांचे खरे समाधान कोणाकडे आहे ? जेव्हा समाज आपले प्रश्न विचारपूर्वक आणि वैज्ञानिक पद्धतीने सोडवू लागेल, तेव्हा बुवा- बाबांच्या अंधश्रद्धेचे जाळे आपोआप कमजोर होईल. कारण श्रद्धा आणि अंधश्रद्धा यातील सीमारेषा ओळखण्यातल्या गोंधळामुळे लोक नव्याने अंधश्रद्धेकडे वळले जात आहेत. बुद्धीवादी म्हणून वावरणाऱ्या लोकांनी गावागावातल्या अंधश्रद्धा कमी करण्यासाठी पुढे आले पाहिजे. व्यापक स्वरूपात जनजागृती मोहीम राबवली तर बुवा- बाबांच्या कचाट्यातून पीडित समाज सुटू शकेल !
