
रयत शिक्षण संस्थेच्या कर्जत तालुक्यातील अळसुंदे येथील न्यू इंग्लिश स्कूलसाठी माजी विद्यार्थी प्रमोद भागवत अनारसे यांच्या वतीने २७५०० रुपये किमतीचे पाच मेगापिक्सेलचे आठ सीसीटीव्ही कॅमेरा संच फिटिंगसह भेट देण्यात आले. प्रमोद अनारसे हे हैदराबाद येथील कंपनीमध्ये सॉफ्टवेअर इंजिनिअर पदावर कार्यरत आहेत तसेच अळसुंदे गावातील प्रगतशील शेतकरी भागवत नारायण अनारसे यांचे सुपुत्र आहेत.

विद्यालयाचे गुरुकुल, सांस्कृतिक व परीक्षा प्रमुख सुनील गोरखे यांच्या प्रयत्नातून विद्यालयास ही आधुनिक काळातील वस्तू रुपातील देणगी प्राप्त झाली. महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण विभागाच्या वतीने विद्यार्थी व विद्यार्थिनी सुरक्षिततेसाठी सीसीटीव्ही कॅमेरा कार्यरत असणे बंधनकारक केले आहे परंतु अळसुंदेसारख्या दुर्बल शाखेला हा आर्थिक भार सहन करणे शक्य नव्हते. अशा वेळी अनारसे कुटुंबीयांनी दानशूर वृत्तीने परिसरातील अनेक विद्यालयास भरघोस मदत केलेली आहे.
विद्यालयातील शैक्षणिक गुणवत्ता, शालेय व सहशालेय उपक्रमातील सहभाग उल्लेखनीय आहेच पण त्याचबरोबर कला, क्रीडा क्षेत्रातही विद्यार्थी आपले नावलौकिक मिळवत आहेत. या दानशूर व्यक्तीच्या कार्याचा वसा घेऊन विद्यालयाचे माजी विद्यार्थी व शिक्षण प्रेमी नागरिक नक्कीच विद्यालयाच्या भौतिक सुविधेसाठी आगामी काळात सहभागी होतील असा असा विश्वास मुख्याध्यापक रामदास परहर यांनी व्यक्त केला. विद्यालयास हा सीसीटीव्ही कॅमेरा संच प्रदान करताना भागवत अनारसे, जिजाबापू अनारसे आणि बाळासाहेब अनारसे यांनी विद्यालयाच्या सर्वांगीण विकासासाठी सतत कार्यरत असणारे मुख्याध्यापक रामदास परहर, मोहन बनसुडे, सुनील गोरखे, रवींद्र विधाते, प्रवीण कांबळे आणि नितीन जगताप यांचे विशेष कौतुक केले.