
कर्जत तालुक्यातील दुधोडी ते सिद्धटेक रस्त्याचे काम गेल्या वर्षभरापासून बंद आहे, यामुळे परिसरातील नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. या मार्गावरील प्रवास खडतर व धोकादायक झाला आहे. रस्त्याचे काम अचानक थांबण्यामागील कारणे अस्पष्ट असली, तरी काहीतरी दबाव असल्याची शक्यता आहे.

यासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते बाळासाहेब कोऱ्हाळे यांनी कठोर भूमिका घेतली आहे. हा रस्ता परिसरातील नागरिकांसाठी अत्यंत महत्त्वाचा असून, शेतकरी, विद्यार्थी, कामगार यांना दररोज प्रवास करताना होणाऱ्या त्रासामुळे त्यांचे दैनंदिन जीवन विस्कळीत झाले आहे. जर पुढील आठ दिवसात हे काम पुन्हा सुरू झाले नाही, तर आम्ही सिद्धटेक येथे रास्तारोको आंदोलन छेडू. या आंदोलनाची जबाबदारी संपूर्णतः संबंधित ठेकेदार व प्रशासनावर असेल, असा इशारा कोऱ्हाळे यांनी दिला आहे.
त्यांनी म्हटले आहे, संबंधित ठेकेदाराने तातडीने या कामाची दखल घ्यावी आणि काम सुरू करून वेळेत पूर्ण करावे. जर आठ दिवसात हे काम सुरू झाले नाही, तर आम्हाला आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागेल. नागरिकांच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका. सिद्धटेक हे धार्मिक स्थळ आहे. सिद्धिविनायकाच्या दर्शनासाठी वर्षभर भाविकांची वर्दळ असते. खराब रस्त्यांमुळे भाविकांनाही अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे हा प्रश्न केवळ स्थानिक नागरिकांचा नसून भाविकांच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे, असेही बाळासाहेब कोऱ्हाळे यांनी म्हटले आहे.