अवैध दारू विक्रीप्रकरणी नांदगावमधील महिलेविरुद्ध गुन्हा दाखल

कर्जत : प्रा. किरण जगताप

कर्जत तालुक्यातील नांदगाव येथे एका ६७ वर्षीय महिलेविरुद्ध अवैध दारू विक्रीप्रकरणी कर्जत पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जुबेदा हुसेन सय्यद, वय ६७ वर्षे असे दारू विक्री करणाऱ्या महिलेचे नाव आहे.

नांदगाव गावाच्या शिवारात गावठाण येथे घराच्या भिंतीच्या आडोशाला एक महिला देशी, विदेशी दारुची विक्री करत असल्याची गुप्त माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी यांना मिळाली. त्यानुसार पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली कर्जत पोलिसांच्या पथकाने शासकीय वाहनातून जात त्या ठिकाणी छापा टाकला. त्यामध्ये महिला ही अवैध दारू विक्री करत असल्याचे पोलिसांना आढळून आले. पोलिसांनी छापा टाकून जुबेदा हुसेन सय्यद या महिलेच्या ताब्यातून एकूण ८९१० रुपयांची दारू जप्त केली.

जप्त केलेल्या मद्यांमध्ये देशी, विदेशी दारूच्या ८० हून अधिक बाटल्यांचा समावेश आहे. पोलिसांनी माहिती घेतली असता महिला जुबेदा हुसेन सय्यद हिच्याकडे दारू विक्रीसाठी कोणताही वैध परवाना नसल्याचे स्पष्ट झाले. या प्रकरणी महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम, १९४९ च्या कलम ६५ ( ई ) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महिला पोलीस कॉन्स्टेबल राणी व्यवहारे यांनी अवैध दारू विक्री करणाऱ्या महिलेविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस हवालदार सलीम शेख करत आहेत.