
पत्रकारिता ही समाजाच्या आरशासारखी असते. समाजात घडणाऱ्या घटनांचे प्रतिबिंब दाखवणे, त्या घटनांचे विश्लेषण करणे आणि जनतेपर्यंत वस्तुस्थिती पोहोचवणे ही पत्रकारांची महत्त्वाची जबाबदारी आहे. परंतु या जबाबदारीबरोबरच पत्रकारांनी स्वतःच्या कार्याची सत्यता, पारदर्शकता आणि नीतिमत्ता तपासली पाहिजे. समाजासाठी पत्रकार हे मार्गदर्शक ठरतात. परंतु पत्रकारांच्या कार्यावरही सामाजिक नियंत्रण हवे, कारण समाजाने त्यांना अंधाधुंद वागण्याचा परवाना दिलेला नाही.

पत्रकारितेला स्वायत्त क्षेत्र मानले जाते, जेणेकरून कुठल्याही राजकीय, आर्थिक किंवा सामाजिक दबावातून बाहेर राहून पत्रकार सत्य मांडू शकतील. पण स्वायत्ततेसोबत पत्रकारांवर सामाजिक जबाबदारीचेही ओझे असते. पत्रकार किंवा माध्यमसंस्थांनी स्वतःच्या स्वायत्ततेचा दुरुपयोग केल्याने गैरसमज पसरतो किंवा चुकीच्या प्रवृत्ती रुजतात. म्हणूनच पत्रकारांना त्यांच्या कार्याचा विचारपूर्वक अभ्यास करावा लागतो. पत्रकारांचे काम हे सामाजिक न्यायासाठीच असते. पत्रकारांसह कोणाचेही मत अंतिम सत्य नसते. त्यांच्या लेखनावर, मांडणीवर आणि वर्तनावर समाजाने सजगतेने लक्ष ठेवले पाहिजे.
सामाजिक दबाव म्हणजे पत्रकारांवर नियंत्रण आणण्याचा प्रयत्न नव्हे, तर त्यांच्या कार्याचे समीक्षण करणे होय. पत्रकार हा समाजाचाच एक भाग असल्याने त्यांच्यावर बाह्य गोष्टींचा प्रभाव पडणे सहज शक्य असते. त्यामुळे समाजाने पत्रकारांच्या मांडणीतील सत्यतेची खातरजमा करण्याची भूमिका पार पाडली पाहिजे. उदा., एखाद्या बातमीत एकतर्फी मांडणी झाल्यास त्यावर प्रश्न विचारले गेले पाहिजेत. त्यामुळे पत्रकारांना अधिक जबाबदारीने आणि पारदर्शकतेने मांडणी करण्यास प्रेरणा मिळते.
समाज आणि पत्रकार यांचे नाते हे परस्परावलंबी आहे. पत्रकार समाजातील घटनांचे दस्तऐवजीकरण करत असतात आणि समाजाला दिशा देण्याचे काम करतात. त्याचप्रमाणे समाजानेही पत्रकारांच्या कामाची अचूकता आणि प्रामाणिकता तपासण्याची भूमिका निभावली पाहिजे. माध्यमसंस्थांवर होणारे आर्थिक, राजकीय आणि सामाजिक दबाव टाळण्यासाठी पत्रकारांनी स्वतःची नीतिमूल्ये जपली पाहिजेत. पत्रकारांवर प्रभाव टाकणाऱ्या घटकांना नियंत्रित करण्यासाठी पत्रकार करत असलेल्या प्रयत्नांना समाजाने साथ देणेही तितकेच महत्त्वाचे असते.
पत्रकारिता हे समाजातील सत्य मांडण्यासाठी महत्त्वाचे क्षेत्र आहे, परंतु पत्रकारही माणसच आहेत. त्यामुळे त्यांच्याकडून चुका होण्याची शक्यता असते. त्यांच्या कार्यावर सामाजिक दबाव असणेही गरजेचे असते. समाजाने पत्रकारांच्या चांगल्या कामाचे कौतुक करावेच, पण त्याचवेळी त्यांच्या कार्याचे परीक्षण करून त्यांना योग्य मार्गदर्शनही करावे. पत्रकारितेची नीतिमत्ता जपणे ही समाजाची आणि पत्रकारांची सामूहिक जबाबदारी आहे, असे वाटते.
