
रयत शिक्षण संस्थेच्या कर्जत तालुक्यातील अळसुंदे येथील न्यू इंग्लिश स्कूलमध्ये इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांचा सदिच्छा समारंभ भावनिक वातावरणात संपन्न झाला. विद्यालय, विद्यार्थी शिक्षक व परिसर सोडून जाण्याचे दुःख आणि त्याचवेळी उज्वल भविष्याकडे जाण्याच्या संधीच्या प्राप्तीचा आनंद असा संमिश्र भावनांचा हा कार्यक्रम संपन्न झाला. इयत्ता नववीच्या विद्यार्थ्यांद्वारे दहावीच्या विद्यार्थ्यांना दिला जाणारा निरोप सर्व विद्यार्थ्यांना भावनिक करून गेला.

प्रास्ताविकातून प्रमुख अतिथींच्या परिचय मुख्याध्यापक रामदास परहर यांनी विद्यालयाच्या शैक्षणिक व भौतिक सुविधांची माहिती मान्यवरांना दिली तसेच आगामी परीक्षेसाठी विद्यार्थ्यांचे अभिष्टचिंतन केले. या कार्यक्रमात अंकिता मोहन गदादे, मीनाक्षी सर्जेराव मोहोळकर, तनुजा जाकीर तांबोळी, गौरी गाडे, ऋतुजा दत्तात्रय आढाव, आयुष अविनाश रणसिंग, प्रतीक्षा जयसिंग लोंढे, सिद्धार्थ महेंद्र गाडे आणि ऋषिकेश संजय देवकाते या विद्यार्थ्यांनी आपल्या मनोगतातून विद्यालयाविषयी असणाऱ्या कृतज्ञतेच्या भावनांना वाट मोकळी करून दिली.
याप्रसंगी इयत्ता दहावीचे वर्गशिक्षक व सांस्कृतिक विभाग प्रमुख सुनील अर्जुन गोरखे यांनी शिक्षक आणि पालकांची विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी असणारी तळमळ गोष्टी रूपाने मांडली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भारतीय समाज विकास व संशोधन संस्थेचे विश्वस्त अप्पा अनारसे हे होते. इयत्ता दहावी नंतरच्या करिअरच्या संधी विषयी सविस्तर माहिती देऊन विद्यार्थ्यांच्या मनातील करिअर विषयक शंकांचे निरसन आजचे प्रमुख वक्ते निरंजन तोरडमल यांनी केले. या कार्यक्रमात सांस्कृतिक विभाग प्रमुख सुनील गोरखे यांनी गायलेल्या अखेरचा हा तुला दंडवत या गीताने उपस्थित दहावीचे विद्यार्थी व त्यांच्या शिक्षकांच्या डोळ्यातील अश्रूंचा बांध फुटला आणि वातावरण अतिशय भावनिक झाले होते.
सूत्रसंचालन इयत्ता नववीच्या विद्यार्थिनी मानसी सुधीर गार्डी व तृप्ती राजेंद्र बरकडे यांनी केले तर सुदर्श गोकुळ पवार यांनी उपस्थितांचे आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विद्यालयाचे ज्येष्ठ शिक्षक मोहन बनसुडे, प्रवीण कांबळे, रवींद्र विधाते, माधवी सुरवसे आणि नितीन जगताप यांचे विशेष मार्गदर्शन लाभले. विद्यालयातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगती बरोबरच त्यांची भावनिकता आणि विद्यालयाशी असलेले अतूट स्नेहबंध व्यक्त करण्याच्या सदिच्छा समारंभाच्या आयोजनाबद्दल सर्व पालक व शिक्षण प्रेमी नागरिकांनी शालेय व्यवस्थापनाचे अभिनंदन केले.
