
कर्जत शहराजवळील म्हेत्रे मळा येथे विहिर फोडण्यासाठी केलेल्या स्फोटादरम्यान उडालेल्या दगडांमुळे अनेकजण जखमी झाले. यामधील एका तरुणाचा लगेचच मृत्यू झाला. या प्रकरणी कर्जत पोलीस ठाण्यात विहीर मालक, ट्रॅक्टर चालक व मॅक्झिन मालकाविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या बाबत मिळालेल्या माहितीनुसार, दिनांक १८ फेब्रुवारी २०२५ रोजी संध्याकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास म्हेत्रेमळा येथे गणेश म्हेत्रे याच्या विहिरीतील खोदकाम सुरू होते. या ठिकाणी विहिरीवरील मजुरांना कोणतीही सुरक्षा साधने न देता ब्लास्टिंग करण्यात आले. मॅक्झिन मालक दत्तात्रय विक्रम जायभाय याने स्वतः उपस्थित राहून नियंत्रित स्फोट करणे आवश्यक असताना तो तिथून निघून गेला. त्यामुळे गणेश म्हेत्रे व दोन, ट्रॅक्टर चालक यांनी कोणतेही प्रशिक्षण नसताना स्फोट घडवला. या स्फोटामुळे विठ्ठल लक्ष्मण जाधव, वय २७ वर्षे, राहणार करमाळा, जिल्हा सोलापूर हे गंभीर जखमी झाले व त्यांचा मृत्यू झाला. यावेळी मजूर संतोष कुमार हेही तेथे काम करत होते. तेही यामध्ये गंभीर जखमी झाले. त्यांचाही उपचारादरम्यान मृत्यू झाला असल्याची माहिती मिळत आहे.
या घटनेनंतर विहीर खोदकाम करणारे मिनीनाथ उद्धव चोपडे, वय ४५ वर्षे, राहणार वीट, ता. करमाळा, जिल्हा सोलापूर यांनी कर्जत पोलिसात फिर्याद दिली. त्यांच्या तक्रारीवरून गणेश म्हेत्रे, राहणार म्हेत्रेमळा, कर्जत, त्याचबरोबर दोन अज्ञात ट्रॅक्टर चालक, तसेच मॅक्झिन मालक दत्तात्रय विक्रम जायभाय, राहणार दूरगाव, तालुका कर्जत यांच्याविरोधात भारतीय दंड संहितेच्या कलम १०५, २८८, १२५, १२५ (अ), १२५(ब), (३), (५) तसेच स्फोटक पदार्थ अधिनियम १९०८ च्या कलम ३, ४, ५, ६ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
घटनेची माहिती मिळताच कर्जत उपविभागीय पोलीस अधिकारी विवेकानंद वाखारे, पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव तसेच तपास अधिकारी पोलीस उपनिरीक्षक बोराडे यांनी घटनास्थळी भेट दिली. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक बोराडे हे करीत आहेत.कर्जत लाईव्ह प्रतिनिधी
कर्जत लाईव्ह प्रतिनिधी