घरकुल मंजुरीपत्रांचे वितरण ; लाभार्थ्यांनी उपस्थित रहावे : सभापती प्रा. राम शिंदे

कर्जत : प्रा. किरण जगताप

महाआवास अभियान २०२४- २५ अंतर्गत प्रधानमंत्री आवास योजनेच्या लाभार्थ्यांना मंजुरीपत्रांचे वितरण करण्यात येणार आहे. कर्जत- जामखेड तालुक्यातील लाभार्थ्यांनी २२ फेब्रुवारी २०२५ रोजी आपल्या संबंधित ग्रामपंचायतीमध्ये उपस्थित राहावे व राज्य शासनाच्या अभियानात सहभाग घ्यावा. उपस्थित लाभार्थ्यांना घरकुल बांधकाम, साहित्य आणि अन्य संबंधित विषयांवर प्रशिक्षण देण्यात येणार आहे. लाभार्थ्यांनी वेळेत घरकुल बांधकाम पूर्ण केल्यास उद्दिष्ट पूर्ण होण्यास मदत होईल आणि इतर पात्र लाभार्थ्यांनाही या योजनेचा लाभ घेता येईल. त्यामुळे सर्व लाभार्थ्यांनी उपस्थित राहून अभियानाच्या यशस्वीतेसाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन विधान परिषद सभापती प्रा. राम शिंदे यांनी केले आहे.

महाआवास अभियान २०२४- २५ अंतर्गत प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा २ मध्ये कर्जत- जामखेड तालुक्यात एकूण १००७२ लाभार्थ्यांना मंजुरीपत्रे वितरित केली जाणार आहेत. यापैकी ७४८९ लाभार्थ्यांना पहिल्या हप्त्याचे वितरण करण्यात येणार आहे. कर्जत तालुक्यात ६२५८ उद्दिष्ट लाभार्थ्यांपैकी ६१२३ जणांना मंजुरीपत्र मिळणार आहे, तर जामखेडमध्ये ४०८८ पैकी ३९४९ लाभार्थ्यांना मंजुरीपत्रे वाटप केली जाणार आहेत. ग्रामपंचायत स्तरावर लाभार्थ्यांचे स्वागत करून त्यांना मंजुरीपत्रांचे वितरण करण्यात येईल.

महाराष्ट्र शासनाच्या वतीने एकूण २० लाख घरकुल लाभार्थ्यांना मंजुरी दिली जात असून, २२ फेब्रुवारी २०२५ रोजी संध्याकाळी ४.३५ वाजता किमान १० लाभार्थ्यांना पहिला हप्ता वितरित करण्यात येईल. प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये सरपंचांच्या अध्यक्षतेखाली ग्रामसभा आयोजित केली जाणार असून, किमान १०० लाभार्थ्यांचा समावेश असणार आहे. या वेळी उपस्थित लाभार्थ्यांना घरकुल बांधकाम प्रगतीच्या टप्प्यानुसार निधी वाटप प्रक्रिया, बांधकाम साहित्य उपलब्धता, घरकुल बांधकाम आराखडा आदी विषयांवर प्रशिक्षण देण्यात येईल. त्यानंतर मंजुरीपत्रांचे वाटप व काही लाभार्थ्यांना पहिल्या हप्त्याचे वितरण करण्यात येईल.

महाआवास अभियान २०२४- २५ युद्धपातळीवर राबवून राज्य शासन घरकुल बांधकाम उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी प्रयत्नशील आहे. पात्र लाभार्थ्यांनी संबंधित ग्रामपंचायतीशी संपर्क साधून आवश्यक माहिती घ्यावी. तसेच, लवकरच लाभार्थी निवडीसाठी शासन सर्वेक्षण करणार असून, त्यासंबंधीचे निकष लवकरच जाहीर केले जातील.