
कर्जत तालुक्यातील मिरजगाव येथील बाजार तळ येथे शिवजयंती उत्सवानिमित्त छत्रपती केसरी भव्य निकाली कुस्त्यांचे जंगी मैदान सोमवार दि. २४ फेब्रुवारी २०२५ रोजी दुपारी ३ वाजता आयोजित करण्यात आले आहे.

या मैदानात पाच महाराष्ट्र केसरी तर तीन उपमहाराष्ट्र केसरी पैलवान कुस्त्या खेळणार आहेत. यामध्ये ३ लाख ११ हजार रुपयांचे बक्षीस ठेवले आहे. पहिली लढत पै. प्रकाश बनकर व पै. महेंद्र गायकवाड यांच्यात होणार आहे. दुसरी लढत पै. सिकंदर शेख व पै. रवीकुमार (हरियाणा) यांच्यात होणार आहे. तिसरी लढत पै. पृथ्वीराज पाटील व पै. हर्षवर्धन सदगीर यांच्यात होणार आहे, तर चौथी लढत पै. बाला रफिक शेख व पै. माऊली जमदाडे यांच्यात होणार आहे. तसेच इतरही पैलवानांच्या लढती रंगणार आहेत.
यावेळी प्रमुख उपस्थितीत विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे, पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, खासदार निलेश लंके, आमदार रोहित पवार, आमदार सुरेश अण्णा धस, माजी खासदार सुजय विखे पाटील, आमदार विक्रमसिंह पाचपुते, आमदार संग्राम जगताप आणि माजी आमदार बाळासाहेब आजबे उपस्थित राहणार आहेत.
या छत्रपती केसरी भव्य निकाली कुस्त्यांचे जंगी मैदान पाहण्यासाठी सर्व कुस्तीप्रेमींना उपस्थित राहण्याचे आवाहन या स्पर्धेचे आयोजक व छत्रपती उद्योग समूहाचे अध्यक्ष राहुलशेठ पवार यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी पै. वैभव पवार (९३३६३६०७०७) यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
- राहुल अडसूळ, कर्जत तालुका प्रतिनिधी