पळून जाऊन लग्न ! पालकांची मानसिकता बदलण्याची गरज

कर्जत : प्रा. किरण जगताप

जीवन म्हणजे एक सुंदर प्रवास, जिथे प्रत्येकाला आपल्या मर्जीने निर्णय घेण्याचा अधिकार आहे. मात्र, आपल्या समाजात अजूनही प्रेमविवाहाला दूषित नजरेने पाहिले जाते. विशेषतः पळून जाऊन लग्न करणाऱ्या मुला- मुलींवर कठोर सामाजिक बंधने लादली जातात. हा विषय केवळ भावनिक नाही, तर सामाजिकदृष्ट्याही महत्त्वाचा आहे. बदलत्या काळातही आपल्या मानसिकतेत पुरेसा बदल झालेला दिसत नाही.

तरुण मुले- मुली पळून जाऊन लग्न करतात, तेव्हा त्याकडे समस्या म्हणून पाहिले जाते. खरे तर, अल्पवयीन असलेल्या मुला- मुलींनी असे निर्णय घेणे चुकीचे आहे, कारण त्या वयात विचारशक्ती परिपक्व नसते. मात्र, जेव्हा कायद्याने मान्य असलेली वयाची मर्यादा ओलांडलेली तरुण मुले- मुली स्वतःच्या इच्छेने विवाह करतात, तेव्हा त्यांना विरोध करण्याचा कुणालाही अधिकार नाही. मग तरीही पालक आणि समाज का म्हणून त्यांचा विरोध करतात, त्यांना दूषणे देतात ?

पालकांची चिंता समजू शकते. आपल्या मुलांचे भविष्यातील सुख, स्थैर्य आणि सुरक्षितता याची काळजी त्यांना वाटते. परंतु, काळाच्या ओघात पालकांनीही आपल्या विचारसरणीत बदल घडवून आणायला हवा. आपल्या मुलांना योग्य संस्कार देणे हे पालकांचे कर्तव्य आहे, मात्र त्याचा अर्थ त्यांना आयुष्यभर नियंत्रित करणे असा होत नाही. त्यांना मोकळेपणाने विचार करण्याची संधी द्यावी लागेल. मुलांचे निर्णय चुकले तरी त्यांना शिकू द्यावे, त्यांना त्यांच्या अनुभवांतून घडू द्यावे.

आजचे युग जागतिकीकरणाचे आहे. शिक्षण, प्रवास आणि डिजिटल माध्यमांच्या विस्तारामुळे तरुणांच्या विचारसरणीत बदल घडला आहे. जाती- धर्माच्या संकुचित चौकटींपलीकडे पाहण्याची दृष्टी त्यांना मिळाली आहे. मग पालक आणि समाज मात्र अजूनही जुनाट विचारांना चिकटून का राहतात ? कोणी कोणत्या जातीत जन्म घ्यायचा हे कुणाच्याही हातात नसते, मग जातीभेद करून, प्रेमाला बंधनात का टाकले जाते ? प्रेम हा मनाचा नितळ प्रवाह आहे, तो कुठल्याही कुंपणात अडकवता येणार नाही.

प्रेमविवाह केल्याने सामाजिक प्रतिष्ठा कमी होते, ही संकल्पना पूर्णपणे चुकीची आहे. प्रतिष्ठा ही व्यक्तीच्या आचार- विचारांवर अवलंबून असते, त्याच्या निर्णयांवर नव्हे. जर एखाद्या तरुण- तरुणीने परस्पर प्रेमाने विवाह करण्याचा निर्णय घेतला असेल, तर त्यांना पाठिंबा देणे हेच कुटुंबाचे खरे कर्तव्य आहे. त्याऐवजी त्यांच्यावर मानसिक, सामाजिक आणि कधी कधी शारीरिक अत्याचार केले जातात. ही परिस्थिती बदलली पाहिजे.

पालकांनी आपल्या मुलांना समजून घेतले पाहिजे. त्यांच्या निर्णयांचे स्वागत केले पाहिजे. त्यांना योग्य मार्गदर्शन देऊन, त्यांच्या स्वप्नांना बळ द्यायला हवे. त्यांच्या आनंदातच खरा पालकत्त्वाचा विजय आहे. पळून जाऊन लग्न करणाऱ्या मुलांना गुन्हेगार न समजता, त्यांच्या निर्णयाचा आदर करावा. त्यांच्या पुढील जीवनात ते अधिक यशस्वी कसे होतील, याकडे लक्ष द्यावे. समाजानेही पारंपरिक चौकटी मोडून नव्या विचारांना स्वीकारायला हवे. आज गरज आहे, प्रेम आणि स्वातंत्र्याच्या या लढाईत तरुणांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याची !

म्हणूनच, जुनाट मानसिकतेच्या बंधनात अडकण्यापेक्षा प्रेमाला सन्मान द्या. कायद्याच्या चौकटीत राहून प्रत्येक व्यक्तीला आपल्या आयुष्याचा निर्णय घेण्याचा अधिकार आहे. तो अधिकार हिरावण्याचा हक्क कोणालाही नाही. समाजाने आणि पालकांनी मनाचा मोठेपणा दाखवत, या नव्या युगाचा स्वीकार करायला हवा. हीच कुटुंबाची खरी प्रगती असेल, असे वाटते !