राजे युवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून दुरगावमध्ये ‘छावा’चे मोफत प्रदर्शन

कर्जत : प्रा. किरण जगताप

कर्जत तालुक्यातील दूरगाव येथील जिल्हा परिषद शाळेत राजे युवा प्रतिष्ठानच्या वतीने शनिवार दि. १ मार्च २०२५ रोजी रात्री ८ ते १०.३० या वेळेत छावा चित्रपटाचे भव्य मोफत प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे.

हा चित्रपट आठ बाय बारा फुटांच्या एलईडी स्क्रीनवर दाखवला जाणार असून दूरगाव येथील ग्रामस्थांना मोठ्या पडद्यावर ऐतिहासिक चित्रपट पाहता येणार आहे. हा कार्यक्रम गावातील सर्व नागरिकांसाठी आयोजित केला आहे. छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित हा चित्रपट ऐतिहासिक आणि प्रेरणादायी असून नव्या पिढीपर्यंत त्यांच्या पराक्रमाची गाथा पोहोचवण्याचा प्रयत्न या माध्यमातून केला जात आहे. ग्रामीण भागात मोफत चित्रपट दुर्मिळ असल्याने ग्रामस्थांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

या अनोख्या चित्रपट सोहळ्याचा आनंद घेण्यासाठी ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थितत राहावे असे आवाहन दूरगाव ग्रामपंचायतचे सदस्य रवींद्र भगत आणि राजे युवा प्रतिष्ठान यांनी केले आहे.

राहुल अडसूळ, कर्जत तालुका प्रतिनिधी