मानवी देहाला आनंद देणारा ग्रंथ श्रीमद् भागवत : हभप पुरुषोत्तम महाराज पाटील

कर्जत : प्रा. किरण जगताप

मानवी देहाला खऱ्या अर्थाने आनंद देणारा एकमेव ग्रंथ म्हणजे श्रीमद् भागवत ग्रंथ आहे, असे प्रतिपादन राज्यातील प्रसिद्ध कीर्तनकार व भागवताचार्य हभप पुरुषोत्तम महाराज पाटील (बुलढाणा) यांनी केले.

कर्जत तालुक्यातील वडगाव तनपुरा येथे कै. शहाजीराव तनपुरे यांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्ताने श्रीमद् संगीत भागवत कथेचे आयोजन ५ मार्च ते ९ मार्च या कालावधीत करण्यात आले आहे. या कथेचे पहिले पुष्प गुंफताना हभप पुरुषोत्तम महाराज पाटील म्हणाले की, जगात फक्त भगवंत सत्य आहे. याचे उदाहरण देताना त्यांनी सांगितले की, आपण अंधारात पुस्तक वाचण्याचा प्रयत्न केला तर काहीही दिसणार नाही, त्यासाठी प्रकाशाची गरज असते. याउलट, भगवंत हा स्वतःच प्रकाशमान आहे. तो प्रत्येकाच्या जीवनातील अंधकार दूर करून प्रकाश निर्माण करतो.

रामायणामध्ये जीवन कसे जगावे याचे ज्ञान दिले आहे, तर श्रीमद् भागवत ग्रंथामध्ये मानवी जीवनाला आनंद कसा देता येईल, याचा उल्लेख आहे, असेही श्री पाटील यांनी स्पष्ट केले.

कर्जत तालुक्यातील वडगाव तनपुरा येथे प्रथमच अशा पद्धतीने संगीत श्रीमद् भागवत कथा आणि त्याचे निरूपण याचे आयोजन करण्यात आले आहे. या निमित्ताने दूरवरून भाविक या कार्यक्रमाचा लाभ घेण्यासाठी आले होते. संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणात न्हावून निघाला असून, परिसरात सुंदर सजावटही करण्यात आली आहे.

कै. हनुमंतराव शहाजीराव तनपुरे यांच्या प्रतिमेला अभिवादन करून या कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. दररोज सायंकाळी सहा ते नऊ वाजेपर्यंत या संगीत भागवत कथेचे आयोजन करण्यात आले आहे.

पुरुषोत्तम महाराज पाटील हे ‘आवाजाचे जादूगार’ म्हणून ओळखले जातात. त्यांच्या गोड वाणीतून ओवी- विवेचन ऐकताना भाविक भारावून जातात, वातावरण प्रसन्न होते. पहिल्याच पुष्पाच्या वेळी उपस्थितांनी याचा अनुभव घेतला.