गरिबी हा शाप नाही, ती संघर्षाची शाळा आहे !

कर्जत : प्रा. किरण जगताप

गरिबी ही केवळ आर्थिक स्थिती नसून ती जीवनातील महत्त्वाचे धडे शिकवणारी शाळा आहे. काहीजण गरिबीकडे निराशेने पाहतात, तर काही जिद्दीने तिच्यावर मात करतात. गरिबी म्हणजे अपयश नसून, ती संघर्षातून उभे राहण्याची संधी आहे. अनेक नामवंत व्यक्तींनी गरिबीला अडथळा मानण्याऐवजी तिची शिकवण स्वीकारली आणि आपल्या आयुष्याला नवीन दिशा दिली.

गरिबीत वाढलेल्या व्यक्तींना परिस्थितीच्या कठीणतेचा अनुभव असतो. अनेकांना लहान वयातच कष्ट, अपयश आणि संघर्षाची जाणीव होते. त्यामुळे त्यांचे व्यक्तिमत्त्व अधिक परिपक्व होते. श्रीमंत कुटुंबात वाढलेल्या लोकांना जे सहज उपलब्ध होते, त्यासाठी गरिबीतून पुढे आलेल्या व्यक्तींना कठोर मेहनत घ्यावी लागते. पण हा संघर्षच त्यांना अधिक सक्षम आणि आत्मनिर्भर बनवतो.

महाराष्ट्रात अनेक व्यक्तींनी गरिबीवर मात करून स्वतःचे नाव उज्वल केले आहे. धीरूभाई अंबानी यांनी एका छोट्या नोकरीतून सुरुवात करून संपूर्ण रिलायन्स समूह उभारला. नारायण मूर्ती यांचे बालपण अत्यंत साध्या परिस्थितीत गेले, पण त्यांनी ‘इन्फोसिस’सारखी आंतरराष्ट्रीय कंपनी स्थापन केली. या व्यक्तींनी सिद्ध केले की गरिबी ही अडथळा असली तरी ती यशप्राप्तीसाठी अडसर ठरत नाही.

गरिबीतून पुढे आलेल्या लोकांना संपत्तीचे खरे मूल्य कळते. संपत्ती मिळाल्यानंतर ते तिचा सुयोग्य वापर करतात. आर्थिक स्थैर्य आल्यावर अनेकदा व्यक्ती सुस्तावतात आणि संघर्षाची जाणीव आणि क्षमता कमी होते. मात्र, गरिबीतून यशाकडे प्रवास केलेल्या व्यक्तींमध्ये संयम, नम्रता आणि सहनशीलता अधिक प्रमाणात असल्याचे दिसते. त्यांना इतर गरजू लोकांच्या वेदना अधिक समजतात, त्यामुळे ते समाजासाठी अधिक संवेदनशील असतात. ( सर्वच असतात असे म्हणायचे नाही.)

गरिबी ही कायमस्वरूपी राहते, असे नाही. मात्र, ती दूर करण्यासाठी कठोर परिश्रम, जिद्द आणि योग्य मार्गदर्शन आवश्यक असते. शिक्षण, कौशल्य आणि प्रयत्नशीलता यांच्या मदतीने कोणतीही व्यक्ती गरिबीवर मात करू शकते. गरिबीत जन्म होणे हे आपल्या नियंत्रणात नसते, पण गरिबीतून बाहेर पडण्यासाठी प्रयत्न करणे मात्र आपल्या हातात असते.

ज्यांनी गरिबीला शाप मानले, ते त्यामध्येच अडकून राहिले. मात्र, ज्यांनी तिला आव्हान मानले, त्यांनी मोठे यश संपादन केले. म्हणूनच गरिबीकडे नकारात्मक दृष्टीने पाहण्यापेक्षा, तिला एक संधी मानून तिच्यावर मात करण्यासाठी प्रयत्न करावेत. गरिबी ही संधी आहे आणि तिचा योग्य प्रकारे उपयोग केल्यास यशाचा मार्ग नक्की मिळतो, असे वाटते.