
गर्भ गर्भाशयात न राहता गर्भनलिकेत राहिला. मात्र डॉक्टरांनी अचूकपणे निदान व त्यानंतर ऑपरेशन करून महिलेला पूर्ण बरे केले. कर्जत येथील विघ्नहर्ता व गंगाई हॉस्पिटलमधील डॉक्टरांच्या तत्परतेने हे शक्य झाले. त्याबद्दल रुग्णाच्या नातेवाईकांकडून या हॉस्पिटलमधील डॉक्टरांचे आभार मानले आहेत.

कर्जत येथील ३८ वर्षीय मोहिनी कोरे यांचे नसबंदीचे ऑपरेशन झाले असतानाही पुन्हा एकदा दोन दिवसांपासून पोटात दुखत असल्याची तक्रार घेऊन त्या डॉ. मधुकर कोपनर यांच्या गंगाई हॉस्पिटलमध्ये आल्या. सुरुवातीच्या लक्षणांवरून डॉक्टरांनी उपचार केले. मात्र त्या उपचारांनी फरक पडत नसल्याचे लक्षात आल्यानंतर डॉक्टरांनी सर्व तपासण्या केल्या. नसबंदीचे ऑपरेशन झाले असतानाही काही लक्षणांवरून पुन्हा एकदा प्रेग्नेंसी आहे का ? त्याची तपासणी करून डॉक्टरांनी सोनोग्राफी केली असता गर्भ हा गर्भाशयात न राहता गर्भनलिकेत राहिलेला निदर्शनास आला.

डॉक्टरांनी समय सूचकता बाळगत अतिशय तत्पर उपचार करून भूलतज्ञ तसेच डॉ. नितीन खरात यांच्या मदतीने ऑपरेशन करण्याचा निर्णय घेतला. डॉक्टरांच्या शर्तीच्या प्रयत्नांनी पोटामधील दोन लिटरपेक्षा जास्त रक्तस्त्राव काढून ऑपरेशन सुरू ठेवले. ऑपरेशन सुरू असताना दोन बॅग रक्त देऊन पेशंटला जीवनदान मिळवून दिले.

डॉक्टरांच्या तत्परतेमुळे पेशंट सुखरूपतेने व अतिशय आनंदी वातावरणात हॉस्पिटलमधून घरी गेले. डॉक्टरांच्या अथक प्रयत्नांमुळे रुग्ण बरा झाल्याने रुग्णांच्या नातेवाईकांनी विघ्नहर्ता हॉस्पिटलचे गंगाई हॉस्पिटलचे आभार मानले.