उद्योजिका सुवर्णा बरबडे यांना ‘राजमाता जिजाऊ गौरव पुरस्कार’ प्रदान

कर्जत : प्रा. किरण जगताप

उद्योजिका सौ. सुवर्णा रविंद्र बरबडे यांना त्यांच्या उत्कृष्ट उद्योजकतेबद्दल ‘राजमाता जिजाऊ गौरव पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. जिजाऊ सेवा संघ आणि अखिल भारतीय मराठा संघ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या पुरस्कार सोहळ्याचे आयोजन ११ मार्च रोजी बारामती येथे करण्यात आले होते. सौ. शर्मिला पवार आणि सुनंदाताई पवार यांच्या हस्ते त्यांना हा सन्मान प्रदान करण्यात आला.

सौ. सुवर्णा बरबडे या मूळच्या कर्जत तालुक्यातील राशीन येथील असून, त्या एका शेतकरी कुटुंबातून पुढे आल्या आहेत. ग्रामीण भागातून येऊन त्यांनी बारामतीत कापड व्यवसायात स्वतःचे वेगळे स्थान निर्माण केले आहे. आपल्या कष्ट, धाडस आणि व्यावसायिक कौशल्याच्या जोरावर त्यांनी कापड उद्योगात नावलौकिक मिळवला आहे. त्यांच्या या उल्लेखनीय कार्याची दखल घेतच त्यांना ‘राजमाता जिजाऊ गौरव पुरस्कार’ प्रदान करण्यात आला.

या सन्मानामुळे राशीनसह संपूर्ण कर्जत तालुक्यात आनंदाचे वातावरण असून, स्थानिक स्तरावर त्यांचे कौतुक केले जात आहे. महिला उद्योजकांना प्रेरणा देणाऱ्या त्यांच्या या कार्याची मोठी दखल घेतली जात असून, ग्रामीण भागातील महिलाही व्यवसाय क्षेत्रात यश मिळवू शकतात, हे त्यांनी आपल्या उदाहरणातून दाखवून दिले आहे.

वैभव पवार, कर्जत तालुका प्रतिनिधी