
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त प्रा. किरण जगताप संपादित ‘कर्जत लाईव्ह’च्या वतीने घेण्यात आलेल्या तालुकास्तरीय ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धेचे बक्षीस वितरण खेड येथील लोकनायक जयप्रकाश नारायण विद्यालयाच्या प्रांगणात उत्साहात संपन्न झाले. पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव, भारतीय समाज विकास व संशोधन संस्थेचे ट्रस्टी आप्पा अनारसे, मुख्याध्यापक गोरक्ष भापकर, प्रेस क्लबचे अध्यक्ष प्रा. सोमनाथ गोडसे, उदयसिंग राजपूत व मान्यवरांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम झाला.



या कार्यक्रमात प्रथम क्रमांकाची विजेती अनुराधा रामचंद्र वाळुंज ( सौ. सो. ना. सोनमाळी कन्या विद्या मंदिर, कर्जत ), द्वितीय वैष्णवी प्रवीण भोसले ( डी. बी. काकडे विद्यालय, पाटेवाडी ) व तृतीय क्रमांकाचे विजेती प्रिती किशोरसिंग परदेशी (न्यू इंग्लिश स्कूल, कोरेगाव ) यांना ‘कर्जत लाईव्ह’च्या बक्षीसांचे वितरण करण्यात आले.


प्रास्ताविकात संपादक प्रा. किरण जगताप म्हणाले, माजी आमदार डॉ. कुमार सप्तर्षी यांचे कार्य आणि सहवासातून पत्रकारितेबरोबरच सामाजिक कार्याची प्रेरणा मिळावी. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा यासाठी शिवजयंतीनिमित्त तालुकास्तरीय ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धा घेतल्या. यापूर्वीही ‘कर्जत लाईव्ह’कडून महिला दिनानिमित्त लेख लेखन स्पर्धा, विद्यार्थ्यांसाठी चित्र रंगवा, रांगोळी, निबंध आदी स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. यापुढेही हे उपक्रम सुरूच राहतील.

प्रा. सोमनाथ गोडसे म्हणाले, सत्य परखडपणे मांडण्याचे काम कर्जत लाईव्हने वेळोवेळी केले. पाच वर्षाच्या कालखंडात अनेक आघात झाले, खोटे गुन्हेही दाखल झाले, मात्र त्याला न जुमानता त्यांनी पत्रकारिता जोमाने सुरूच ठेवलेली आहे.
मुख्याध्यापक गोरक्ष भापकर म्हणाले, कर्जत लाईव्हच्या माध्यमातून नियमितपणे विविध उपक्रम घेतले जातात. प्रामुख्याने आपल्या विद्यालयामध्ये हे उपक्रम घेतले जातात. यातून विद्यार्थ्यांना विविध मान्यवरांचे मार्गदर्शन लाभते.
उदयसिंग राजपूत म्हणाले, महापुरुषांच्या जयंती निमित्ताने कर्जत लाईव्ह राबवत असलेला हा उपक्रम कौतुकास्पद आहे. ८० च्या दशकात डॉ. कुमार सप्तर्षी यांच्या कार्याची आम्हालाही प्रेरणा मिळाली. विद्यालयीन शिक्षण घेताना त्यांची भाषणे ऐकण्यासाठी आम्ही आवर्जून उपस्थित राहायचो. त्यांच्याकडून खूप काही शिकायला मिळाले.

पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव म्हणाले, मोबाईलच्या गैरवापरामुळे आताची तरुण पिढी बिघडत चालली आहे. विद्यार्थ्यांनी पुस्तकांचे वाचन करावे, भाषणे ऐकावीत. कर्तृत्व सिद्ध करून आई- वडिलांचे नाव मोठे करावे.

कार्यक्रमाचे अध्यक्ष आप्पा अनारसे म्हणाले, भूमिका घेऊन काम करणारे पत्रकार सध्या कमी झाल्याचे दिसतात. मात्र कर्जत लाईव्हने विविध प्रश्नांवर अनेकदा ठोस भूमिका घेतली. त्यासाठी त्यांना किंमत चुकवावी लागली, मात्र त्यांनी भूमिकेत कधी बदल केला नाही. डॉ. कुमार सप्तर्षी यांची विचारधारा पुढे नेण्याचे काम त्यांच्याकडून केले जात आहे.

या कार्यक्रमासाठी विद्यालयातील पाचवी ते दहावीचे मोठ्या संख्येने विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, बक्षीस पात्र विद्यार्थ्यांचे पालक उपस्थित होते. प्रा. संदीप काळे यांनी सूत्रसंचालन करून उपस्थितांचे आभार मानले.