श्रेयवादाची नुरा- कुस्ती अन् आ. रोहित पवारांचा शिष्टाचाराचा रडीचा डाव

कर्जत : प्रा. किरण जगताप

विधान परिषद सभापती प्रा. राम शिंदे यांनी शिष्टाचार पाळावा, नाहीतर त्यांना तो विधानसभेच्या अध्यक्षांनी पाळायला लावावा, अशी टीका आ. रोहित पवार यांनी केली. त्यावर भाजपाचे तालुकाध्यक्ष शेखर खरमरे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.

खरमरे यांनी म्हटले आहे, सतत संविधानाचा दाखला देणारे आमदार रोहित पवार शिष्टाचारानुसार राज्यपालांनंतर विधान परिषद सभापतींचे पद येते, हे विसरत आहेत का? मग शिष्टाचाराच्या दृष्टीने विधान परिषद सभापतींना विधानसभेचे अध्यक्ष कसे काय सांगू शकतात? एवढा शिष्टाचाराचा पुळका येणाऱ्या आमदार पवारांना हा छोटासा शिष्टाचार माहीत नाही का?

आमदार महोदयांचे दुखणे वेगळेच आहे. प्रा. राम शिंदे यांना सभापतीपद मिळाले म्हणजे त्यांचे राजकीय पुनर्वसन न होता तो राजकीय वनवासच आहे, त्यामुळे मतदारसंघाशी त्यांची नाळ तुटेल, असे आमदार पवारांना वाटत होते. मात्र, प्रत्यक्षात उलटेच झाले. प्रा. शिंदे मतदारसंघातील प्रश्नांसाठी सातत्याने प्रयत्नशील आहेत आणि त्यांचा जनसंपर्क मोठ्या प्रमाणावर आहे. त्यामुळेच आमदार महोदयांची अस्वस्थता वाढली आहे. अचानक शिष्टाचाराचा कढ येण्यामागचे हेच खरे कारण आहे.

संवैधानिक पदावर असले तरी आपण जनतेप्रती उत्तरदायी आहोत, हे प्रा. राम शिंदे यांनी पक्षाच्या पहिल्याच सदस्य नोंदणी अभियानात स्पष्ट केले होते. त्यानुसारच ते लोकाभिमुख भूमिका घेत असून मतदारसंघातील विविध प्रश्न मार्गी लावत आहेत.

निवडणुकीच्या काळात आमदार पवार यांनी अनेक मंत्रिपदांच्या घोषणा करून मिरवले, प्रत्येक प्रश्नावर नवीन मंत्रिपद घेतले आणि शेवटी ते मुख्यमंत्री होणार असल्याचेही बोलले गेले. त्यावेळी शिष्टाचार आठवला नाही का? एमआयडीसीच्या प्रश्नावर त्यांनी उद्योगमंत्री होऊन उद्घाटनाची फीत कापण्याची तयारीही केली होती. मात्र, आता तो प्रश्न मार्गी लागला असून लवकरच त्याला मूर्त रूप मिळणार आहे.

याशिवाय, आमदार पवार यांना काही दिवसांपूर्वी सत्तेत जाण्याची इच्छाही होती. ते गोड बातमी देणार, असे त्यांचे कार्यकर्ते समजत होते. मात्र, काहीच घडले नाही. उलट ,’मी शिंदे गटात नाराज आहे’, अशा बातम्या त्यांनी प्रसारमाध्यमांमध्ये पेरल्या. तरीही जयंत पाटील यांनी त्यांना भाव दिला नाही. त्यामुळे राजकीय अडचणीत सापडलेले आमदार पवार आता कमीत कमी सभापतींवर टीका करून प्रकाशझोतात राहण्याचा केविलवाणा प्रयत्न करत आहेत.

आमदार पवार यांनी विधान भवनाच्या आवारात कुस्ती स्पर्धेसाठी सभापतींना आमंत्रण दिले, तेव्हा सभापतींनी कोणताही शिष्टाचाराचा दिखावा न करता ते स्वीकारले. मात्र, तेच आमंत्रण त्यांच्या कार्यालयात जाऊन अधिकृतरित्या दिले असते, तर शिष्टाचार पाळला गेला असता, असे आमदार पवारांना वाटत नाही का ?

प्रा. राम शिंदे हे संवैधानिक पदावर राहूनही जनतेप्रती उत्तरदायी आहेत आणि लोकप्रतिनिधी म्हणून मतदारसंघात कार्यरत आहेत. त्यामुळे आमदार पवारांची राजकीय कोंडी झाली आहे. त्यांच्या स्वतःच्या पक्षातही त्यांना महत्त्व दिले जात नाही. त्यामुळेच ‘माझ्यामुळेच सभापतीपद मिळाले’, अशा आशयाची दर्पोक्ती ते करत आहेत. यावरूनच त्यांच्या मानसिकतेची आणि उद्विग्नतेची कल्पना येते. त्यामुळेच त्यांना अचानक शिष्टाचार आठवला आहे, अशी टीकाही तालुकाध्यक्ष खरमरे यांनी केली आहे.